औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत शनिवारी येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा झाली. मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित बैठकीला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. अब्दुल सत्तार, आ. अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट, आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, माजी आ. कल्याण काळे, माजी खा. व्यंकटेश काब्दे आदी उपस्थित होते. बैठकीचे संयोजक तथा परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख आणि आ. शिरसाट यांनी मोर्चा काढण्याबाबतचा विषय उपस्थित केला. इतरांनीही त्याला दुजोरा दिला.अशोक चव्हाण म्हणाले की, ‘पाण्याचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. एकत्रितरीत्या हा प्रश्न सोडविला पाहिजे.’ पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘हक्काचे पाणी वेळेत मिळाले पाहिजे. योग्य निर्णय योग्य वेळी झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.’ (प्रतिनिधी)भाजपा आमदार मुख्यमंत्र्यांना भेटलेगंगापूर व दारणा धरण समूहातून पाणी सोडल्याप्रकरणी नाशिकचे भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. प्राधिकरणाने घेतलेला निर्णय चुकीचा असून, त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी समिती नेमण्याचे आश्वासन दिले. नाशिक महापालिकेत ‘संतप्तधार’नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीप्रश्नी महापालिकेने तातडीने बोलाविलेल्या विशेष महासभेत पालकमंत्र्यांसह स्थानिक भाजपा आमदार आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तब्बल साडेपाच तास चाललेल्या चर्चेत सरकारविरोधी ‘संतप्तधार’ बरसली. उच्च न्यायालयात महापालिकेमार्फत फेरयाचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात आला.
पाण्यासाठी महामोर्चाची तयारी
By admin | Published: November 08, 2015 12:28 AM