औरंगाबाद : काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, २८८ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचीही आमची तयारी आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिला. अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बसणार नाही, असे वक्तव्य अशा वेळी करायला नको होते; पण आता ते त्यांच्याबरोबरच बसतात ना, असा चिमटाही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काढला . तत्पूर्वी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना राणे यांनी आगामी विधानसभा निवडणूक ‘आम्ही जिंकणारच’ या जिद्दीने कामाला लागा, असा सल्ला दिला. राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव कसला मुख्यमंत्री होतोय. पक्षासाठी चार तास देणारा, चार चार तास वाट बघूनही भेट न मिळू शकणारा असा हा नेता आहे. त्याला कापूस, सोयाबीन कशाला म्हणतात, काही कळत नाही. तो मला मुख्यमंत्री व्हायचंय हे बाईच्या आवाजात बोलत होता की, पुरुषाच्या कळलं नाही. अरे जोरात म्हण ना, मला मुख्यमंत्री व्हायचंय; पण कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. शिवसेनेत कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कसलाच मान-सन्मान नाही, ह सांगताना राणे यांनी काही उदाहरणे दिली. अच्छे दिन आनेवाले है असा नारा देऊन नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. दिलेली आश्वासने पाळण्याची चुणूकसुद्धा त्यांनी दाखविलेली नाही. त्यांची लाट ओसरली हे अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून लक्षात आले आहे. लाट येते आणि ओसरतेही. मोदी सरकार मूठभर धनदांडग्यांना लाभदायक असल्याचा आरोप राणे यांनी केला. राज्यातील ही अशा प्रकारची पहिलीच बैठक होती. या बैठकीला मराठवाडाभरातून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा. रजनी पाटील व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही मार्गदर्शन केले.पक्ष सांगेल तेच : चव्हाणनेते स्वत:च उमेदवाऱ्या जाहीर करीत आहेत. कार्यकर्त्यांचे मरण होत आहे, याकडे एका पत्रकाराने लक्ष वेधताच अशोक चव्हाण म्हणाले, काल भोकरची जागा अमिता चव्हाण यांच्यासाठी जाहीर झाली. असे मुळीच घडलेले नाही. तसेच नांदेड लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे भास्कर पाटील खतगावकर यांनी आधीच जाहीर केले होते. पूर्वी मुस्लिम लीग होती. त्याप्रमाणेच एमआयएमचा फारसा प्रभाव राहणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
प्रसंगी सर्व जागांवर लढण्याचीही तयारी
By admin | Published: September 22, 2014 2:40 AM