अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- परिसरातील गावांना गणेशाच्या आगमनाचे वेध लागले असून विविध मंडळांनी उत्सवाच्या तयारीला प्रारंभ केला आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता, मंडप उभारणी अशा कामांची लगबग दिसून येत आहे. एकंदरीत डेकोरेशन, वर्गणी, जमाखर्च, ते मिरवणूकींच्या नियोजनांची सज्जता सुरू झाली आहेत. गणपतीच्या आगमनाला दहा दिवसांचा अवधी उरला आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत पावसानेही दडी मारली आहे. शिवाय २१ आॅगस्ट रोजी रविवार हा सुट्टीचा दिवस होता. त्याच दिवशी संकष्ट चतुर्थीही होती. या शुभ मुहूर्तावर बोर्डी परिसराच्या गावांमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला आहे. नरपड, चिखले, घोलवड, रामपूर, बोर्डी, झाई अशा गावांमध्ये प्रत्येक, गल्लीत, चौकात, विविध युवा मंडळांतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याने सार्वजनिक गणपतींची संख्या अधिक आहे. दीडदिवसांपासून ते थेट अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे जागेची स्वच्छता, मातीचा भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण, विटा आणि तत्सम वस्तूंची जमवाजमव, बांबूंच्या साह्याने मंडप उभारुन तो प्लॅस्टिक व ताडपत्रीने झाकण्याचे काम झपाट्याने सुरू झाले आहे. विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस आणि पाऊस नसल्याने छोटयांपासून मोठ्यांची धावपळ दिसून येत आहे. संकष्टी चतुर्थी, रविवारचा सुट्टीचा दिवस आणि पावसाने उघड दिल्याने यंदाच्या गणपती उत्सवासाठी विविध कामांना खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.-राकेश सावे (कार्यकर्ता, बोर्डी भाटआळी सार्वजनिक गणेशमंडळ)