शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 06:49 AM2024-07-06T06:49:12+5:302024-07-06T06:49:51+5:30

लोकमत वृत्ताची दखल घेत वडेट्टीवार यांनी विधानसभेत या बाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

Preparations to replace Shahu Maharaj statue in Delhi; Ajit Pawar Testimony in the Legislative Assembly | शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही

शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही

मुंबई - सामाजिक समतेचे अध्वर्यू राजर्षी शाहू महाराज यांचा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा साजेसा नसल्याने तो बदलण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्यावर, हा पुतळा बदलण्याची सरकारची तयारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

वडेट्टीवार म्हणाले की, शाहू महाराजांच्या दिल्लीतील या पुतळ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. अनेक शाहूप्रेमींनी त्याबाबत आक्षेप घेतले आहेत. हा पुतळा कृश आहे, डोळे आत गेलेले आहेत, एकूणच शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब या पुतळ्यात उमटत नाही. या आधी जो पुतळा बसविलेला होता, तो बदलण्याची गरज नव्हती, पुन्हा तोच पुतळा बसवावा. कोल्हापूरच्या दसरा चौकात महाराजांचा जसा पुतळा आहे तसाच बसविण्यात यावा.

यावर अजित पवार म्हणाले की, शाहू महाराजांचे वंशज असलेले छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खासदार म्हणून दिल्लीत गेलेले आहेत. ते महाराजांचे वारसदारच आहेत तेव्हा त्यांच्याशी मी या पुतळ्यासंदर्भात चर्चा करेन. गरज भासल्यास त्यांना मी दिल्लीत जाऊनही भेटेन. पुतळा बदलण्याची सरकारची तयारी आहे. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसाच पुतळा असायला हवा, ही सरकारची भूमिका आहे.

लोकमतची दखल
‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात महाराष्ट्र सदनमधील शाहू महाराजांच्या पुतळ्याबाबतचे सविस्तर वृत्त दिले होते. त्याची दखल घेत वडेट्टीवार यांनी विधानसभेत या बाबतचा मुद्दा उपस्थित केला.

Web Title: Preparations to replace Shahu Maharaj statue in Delhi; Ajit Pawar Testimony in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.