शरद पवारांना शह देण्याची तयारी, राज्यभरात अजित पवार गटाची मोर्चेबांधणी, केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:19 PM2023-08-18T23:19:20+5:302023-08-18T23:21:09+5:30
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांना शह देऊन राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटानं मोठं पाऊल उचललं आहे.
राज्यात पक्ष संघटना वाठवण्यासाठी राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली असून, एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे.
या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार @praful_patel यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
— Sunil Tatkare (@SunilTatkare) August 18, 2023
राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. @AjitPawarSpeaks दादा यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, राष्ट्रीय… pic.twitter.com/C3ALMRpX9Y
हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची जबाबदारी असेल. अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल पाटील यांच्याकडे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मारावबाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.