कल्याण : बीएसयूपी योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेची १४०० घरे बांधून तयार आहेत. त्यांचे वाटप लवकरात लवकर करावे, अशी मागणी बीएसयूपी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिका सचिवांकडे केली आहे. पण लाभार्थींची यादी तयार नसल्याने आणि पालिकेला घरे ताब्यात देण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने हे वाटप रखडले आहे. केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत पालिकेने १३ हजार घरे बांधण्याचा प्रकल्प २००९ मध्ये हाती घेतला होता. मात्र त्यात प्रचंड दिरंगाई झाल्याने या प्रकल्पातील घरांचे उद्दीष्ट कमी करण्यात आले. आता १३ हजारांऐवजी आठ हजार १८६ घरे बांधण्याचे उद्दीष्ट महापालिकेसमोर आहे. महापालिकेने या प्रकल्पांतर्गत डोंबिवलीतील आंबेडकरनगर आणि दत्तनगरात जवळपास ४०० घरांचे वाटप केले. पालिकेने आतापर्यंत केवळ १४०० घरे बांधून पूर्ण केली आहे. पण त्याचे वाटप झालेले नाही. ते व्हावे, म्हणून प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी सचिव सुभाष भुजबळ यांना पत्रही पाठवले आहे. पालिकेने लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ती तयार नसल्याने घरे वाटता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या १४०० घरे बांधून पूर्ण झाली असून ती वाटपाच्या प्रतिक्षेत आहे, तर आणखी ५०० घरे मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित घरे मार्च २०१७ अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.
बीएसयूपीतील १४०० घरे तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2016 4:03 AM