अजित मांडके,
ठाणे- तलावांतील प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने चार वर्षांपासून ‘इकोफ्रेंडली गणेशोत्सव’ ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली. ही संकल्पना आता संपूर्ण महाराष्ट्रात रुजते आहे. यंदाही ठाणे महापालिका पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज झाली आहे. मागील वर्षी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलाव आणि गणेश विसर्जन घाटांवर ४७ हजार १३८ गणपतींचे विसर्जन झाले होते. यंदा हा आकडा ५० हजारांच्या पुढे जाईल, अशी आशा पालिकेने व्यक्त केली आहे. त्यानुसार आतापासून पालिका कामाला लागली आहे. पर्यावरणाभिमुख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी ठाणे महापालिका उपाययोजना करीत असून गेल्या अनेक वर्षांपासून शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. या व्यवस्थेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळतो. यावर्षीही तशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून सर्व गणेशभक्तांनी याला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी) >रेतीबंदर व कोलशेतला महाघाट : गणेश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे, यासाठी महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत. तेथे छोटया गणेश मूर्तींबरोबरच पाच फुट आणि त्यापेक्षा मोठया आकाराच्या गणेश मुर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था आहे. महापालिका आरतीस्थाने आणि निर्माल्य कलशाबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवणार आहे. भरती आणि ओहोटी लक्षात घेऊनच हे विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत.गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रेदरवर्षीप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन शक्य नाही त्यांच्यासाठी मूर्ती स्वीकार केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे. ती मडवी हाऊस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदिर, चिरंजीवी हॉस्पिटल, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाईप लाईन ब्रीज, १६ नं. पाईपलाईन ब्रीज, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी असतील. तेथेही आरतीस्थाने, निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध असतील. या केंद्रांवर प्राप्त होणाऱ्या सर्व गणेश मुर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विशेष स्वयंसेवकांची नियुक्तीनेहमीप्रमाणे दीड दिवसाचा, पाच दिवसाचा आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जनादिवशी सुरक्षाची व्यवस्था पाहण्यासाठी पोलिसांबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्नीशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, खाजगी डिझास्टर मॅनेजमेंट संस्थेचे ५०० प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.