अकोला : मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीचा लाल दिवा १ मे पासून काढण्यात येणार असल्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी निर्णय घेतला आहे. ‘दिव्या’चा अधिकार असलेल्या पश्चिम वऱ्हाडातील दोन्ही मंत्र्यांनी तसेच राज्यमंत्रीपदाचे दर्जा असलेल्या महामंडळ अध्यक्ष व जि.प. अध्यक्षंनी या निर्णयाचे स्वागत करून दिवा काढण्याच्या आदेशाची तत्काळ अमंलबजावणी केली. तर अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशातील स्पष्टता समोर आल्यावर आपल्या गाडीवरचा लाल दिवा लगेच काढला जाईल अशी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. केंद्राने लाल दिव्याला तिलांजली दिल्यानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी लाल दिवा वापरणे बंद केल्यामुळे त्यांचे मंत्री मंडळातील सहकारी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनीही गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला. कृषीमंत्री मंगळवारी दूपारी सह्यांद्री विश्रामगृहावर विविध बैठका घेत असताना त्यांना या निर्णयाची माहिती मिळाली. बैठक संपवून आपल्या शासकीय निवासस्थानी प्रस्थान करताना त्यांनी दिवा काढण्याच्या सूचना चालकाला देऊन विना दिवा गाडीमधून प्रवास केला. राज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील हे बुधवारी सकाळपासूनच मंत्रालयात होते. दिव्या संदर्भातील निर्णय कळताच त्यांनी त्यांच्या सचिवांना सांगुन तत्काळ दिवा काढण्याची सूचना केली. मंत्रालयातील कामकाज संपताच त्यांनी दिवा नसलेल्या गाडीमधून निवासस्थानापर्यंत प्रवास केला. या संदर्भात ‘लोकमत’ शी बोलतांना त्यांनी सांगीतले की, हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे, लालदिव्यामुळे अनेकदा रहदारी थांबवून गाडीला मार्ग काढून दिल्या जात असे त्यामुळे थांबलेल्या वाहनांमधील अॅम्बुलन्स असेल किंवा सामान्य नागरीक असतील त्यांना नाहक त्रास होत असे. मी मंत्री झाल्यावर निवासस्थानावर देण्यात येत असलेला बंदोबस्तही नाकारला होता त्यामुळे हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनीही या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून आपल्या गाडीवरील दिवा हटविला. बुलडाण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा उमा शिवचंद्र तायडे यांनाही राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेला लाल दिवा तत्काळ काढून टाकला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे तसेच वाशीम जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी देखील केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करून आदेश प्राप्त होताच वाहनावरील लाल दिवा हटविला जाईल, असे सांगितले. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या वाहनावर अंबर दिवा आहे त्यांनी सांगीतले की, शासनाचे दिशानिर्देश प्राप्त होताच धोरणानुसार तत्काळ कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनीही शासनाचे आदेशातील स्पष्टता समोर आल्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगीतले. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय मान्य आहे. याबाबतचे आदेश प्राप्त होताच वाहनावरील दिवा हटविण्यात येईल. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनीही आपल्या प्रतिक्रियेत वाहनावरील लाल दिवा हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करित यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर लगेच कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
‘दिवा’ काढण्याबाबत पश्चिम वऱ्हाडात तत्परता!
By admin | Published: April 20, 2017 12:46 AM