मिशन ४५ प्लसची तयारी! भाजपा 'या' ६-७ दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 09:55 AM2023-09-30T09:55:56+5:302023-09-30T09:56:41+5:30
राज्यातील ६-७ आमदारांना दिल्लीत पाठवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभानिहाय मतदारसंघात बुथ बैठका, पदाधिकारी मेळावे आणि आढावा बैठक घेण्यात येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ हून अधिक जागा जिंकण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. त्यासाठी सोबतीला एकनाथ शिंदे, अजित पवारांसारखे नेते घेतले आहेत. आता भाजपा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात महाराष्ट्रातील ६-७ दिग्गज आमदारांना उतरवण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील ६-७ आमदारांना दिल्लीत पाठवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या मतदारसंघात भाजपाची चाचपणी सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राहुल नार्वेकर, राम सातपुते, संजय केळकर, आकाश फुंडकर यांना खासदारकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या नेत्यांची मतदारसंघातील लोकप्रियता, जातीय समीकरणे पाहून या आमदारांना लोकसभेचे तिकीट दिले जाईल अशी चर्चा सुरू आहे.
अलीकडेच मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत ३ केंद्रीय मंत्री, ४ खासदारांना आमदारकीचे तिकीट भाजपाने दिले. याच धर्तीवर जिंकून येण्याची क्षमता हा निकष ठेवून भाजपा उमेदवारी देणार आहे. इतकेच नाही सध्या मित्रपक्ष असलेल्या खासदारांच्या मतदारसंघातही भाजपाने उमेदवारासाठी चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेसाठी भाजपाने सर्व्हेक्षण केले. त्यात प्रचाराची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असतील. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या मतदारसंघात गुंतवणूक ठेवले जाणार नाही. राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
कोणत्या नेत्यांची चर्चा?
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
गिरीश महाजन – रावेर
चंद्रशेखर बावनकुळे – वर्धा
रविंद्र चव्हाण – ठाणे
संजय केळकर – ठाणे
राहुल नार्वेकर – दक्षिण मुंबई
आकाश फुंडकर – अकोला
राम सातपुते – सोलापूर
विनोद तावडे -मुंबई