पुणे - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलनात उतरलेले मनोज जरांगे पाटील आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांची मराठा समाज शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला आहे. मात्र आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील २९ ऑगस्टला मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारणातले डाव सांगायचे नसतात. २९ ऑगस्टला निवडणूक लढायची की नाही हे ठरवणार आहोत. माझ्या शरीरापेक्षा माझा समाज महत्त्वाचा आहे. समाजाला न्याय देणं गरजेचे आहे. सगळं आता सांगणार नाही. राजकारणात काही गोष्टी उघड्या करायच्या नसतात. राजकारण हे टक्क्यावर नसते तर २९ ऑगस्टला फायनल निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच ओबीसी-मराठा एकत्र आहे. गोरगरिब मराठ्यांचे, ओबीसींचे वाटोळे करू नका. राजकारण साध्य करण्यासाठी भांडणे लावू नका. किती निवडून आणायचे हे मी बघतो. मराठा समाजात फूट दाखवायची हे षडयंत्र देवेंद्र फडणवीसांचे आहे. मराठ्यांमध्ये फूट पडणार नाही. फडणवीसांचे स्वप्न कधीच साकार होणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यात फूट पडणार नाही. ओबीसीतून आरक्षण मिळवणारच, राखीव जागेतून आमच्या विचारांची माणसे निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक आम्ही उभे करणार. ही सर्वसामान्यांची लाट असणार आहे असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, माझ्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर हे समाजातील भावना आहे. परंतु मी स्वार्थी नाही. मला त्याचा नाद नाही. समाजाला लुटून मी मोठा होणार नाही. सर्व समाजातील गोरगरिब सत्तेत आणायचे आहेत. आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करतोय. लढायचं की पाडायचं हे २९ तारखेला अंतिम होणार आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.