मनोहर कुंभेजकर,
मुंबई- जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जोगेश्वर सिमेंट यार्ड येथील व्यापारी, रेल्वे माथाडी बोर्ड आणि इतर कामगार संघटना यांच्या भोंगळ कारभारामुळे येथील कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील व्यापाऱ्यांसोबत झालेल्या शासकीय बैठकीत एका नामचीन गुंडाची उपस्थिती होती, अशी धक्कादायक माहिती हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संदीप जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. मुंबई पोलिसांत या गुंडाविरुद्ध गंभीर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. या शासकीय बैठकीत गँगस्टर असतानाही मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची विचारणा का केली नाही, असा सवालही आता उपस्थित होत आहे. या बैठकीत या गुंडाची उपस्थिती होती, हे आम्ही सिद्ध करण्यास तयार असल्याचे संदीप जाधव, सुरेश धनावडे, अजय बारी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी ‘दि रेल्वे गुड्स क्लिअरिंग अॅन्ड फॉरवर्डिंग एस्टाब्लिशमेंटर लेबर बोर्डाचे अध्यक्ष आणि सचिव यांना दिले आहे. या प्रकरणी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचा येथे एप्रिल महिन्यात प्रवेश झाला. त्यांनी कामगारांचा प्रश्न हाताळायला लागल्यापासून येथील ठेकेदार असलेले व्यापारी टीपीके मूव्हर्स व इतर संघटना व बोर्डाचे अधिकारी हे सर्व मिळून कामगारांची पिळवणूक करत आहेत. येथील माथाडी कामगारांना योग्य तो न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संदीप जाधव यांनी दिला आहे.येथील माथाडी कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही. मजुरीच्या पगाराच्या पावत्या मालक गहाळ करतो, असाही आरोप या संघटनेने केला आहे. यामुळे माथाडी कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मालकांकडून कामगारांना धमक्या व शिवीगाळ होत होती, म्हणून पोलिस ठाण्यात गेले असता वनराई पोलिस ठाण्यातून १४४ ची नोटीस व्यापाऱ्याला बजावण्यात आली. व्यापाऱ्याविरुद्ध कामगारांना धमकावण्याचा गुन्हा दाखल असल्याचेही जाधव यांनी सांगितले. या बाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कामगारांना न्याय मिळत नव्हता. बोर्डाचे अधिकारी प्रत्येक वेळी टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे आमच्या संघटनेने एकत्रित मिटिंगमध्ये सर्व माथाडी संघटना व कामगार तसेच बोर्डाचे अधिकारी व व्यापारी एकत्रित बसून अडचणींवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय मिटिंग लावली. या बैठकीच्या वेळी मंडळाचे अधिकारी तसेच माथाडी संघटनेचे नेते नरेंद्र पाटील व इतर संघटनेचे नेते देखील हजर होते. मात्र येथील व्यापाऱ्यांसोबत एका नामचीन गँगस्टरचीही उपस्थित होती, अशी धक्कादायक माहिती संदीप जाधव यांनी दिली.गुंडाबाबत माहिती नाही - चौधरीया संदर्भात द रेल्वे गुड्स क्लिअरिंग अॅन्ड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, या बैठकीत मालकांचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, आमदार नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. मात्र गुंडाची उपस्थिती असल्याची माहित नाही, असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.