मुंबई : आरोपींना ठरल्या तारखांना हजर न केल्याने सुनावणी तहकूब करावी लागल्याने खटल्यांना विलंब होत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने पोलीस आणि कारागृह प्रशासनाचे कान उपटले असून अशी वेळ येऊ नये यासाठी विधी आणि न्याय मंत्रालयाने आवश्यक परिपत्रक काढून सर्व संबंधितांना सूचना द्याव्या, असा आदेश दिला आहे.मुंबईतील एका फौजदारी खटल्यातील आरोपी मुकेश कुमार जगदीश यादव यास गेल्या वर्षभरात सलग १४ तारखांना पोलिसांनी हजर न केल्याने सत्र न्यायालयास खटल्याचे कामकाज तहकूब करावे लागले, असे यादव याने केलेल्या याचिकेवरील सुनावणीत निदर्शनास आले. त्यानंतर न्या. साधना जाधव यांनी अलीकडेच हे आदेश दिले. यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना परिणामकारक पावले उचलण्यासही न्यायालयाने सांगितले. त्यासाठी नेमके काय केले याचे प्रतिज्ञापत्र आयुक्तांनी १९ नोव्हेंबरपर्यंत करायचे आहे.आणखी एक आरोपी रमेश पाटील याने जामिनासाठी अर्ज केला तेव्हा खटला सुरु झाला आहे व साक्षीदारांच्या साक्षी सुरु आहेत, असे प्रॉसिक्युटरने सांगितल्याने पाटील याचा जामीन आपणच नाकारला होता, असेही न्या. जाधव यांनी नमूद केले. दंड प्रक्रिया संहितेतील तरतुदींचा दाखला देऊन न्या. जाधव यांनी म्हटले की, ‘फौजदारी गुन्ह्यांची दखल न्यायालायने घेतल्यानंतर खटला लवकरात लवकर चालवून तो संपविणे आणि न्याय होणे हा आरोपीचाही घटनादत्त हक्क आहे. (विशेष प्रतिनिधी)
आरोपींना वेळेवर कोर्टात हजर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2015 12:21 AM