मुंबई - गुरुच महत्त्व आधोरेखित करणारा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंसाठी वडील शरद पवारच गुरू आहेत. मात्र शरद पवार आपल्या लेकीला शिष्य मानत नसून ती आपल्यासाठी मुलगीच असल्याचे पवार यांनी म्हटले. गुरुपौर्मिमेनिमित्त एका वृत्तवाहिनीवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते.
'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी' ही ओळ सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या प्रचारसभेत म्हटली होती. यावर सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपले मत मांडले.
दरम्यान सुप्रिया तुमच्या शिष्य का, असं शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, सुप्रिया शिष्य नसून मुलगीच बरी. ती काही मला शिष्य वाटत नाही आणि मी देखील तिचा गुरू नाही. आमच्यात चर्चा होत असते. अनेकदा मतभेद होतात, परंतु, विश्लेषण करून सांगितल्यानंतर ती मान्य करते. आता आम्ही अशा स्थितीत पोहोचलो ज्यामध्ये आम्ही एकमेकांचे सहकारी आहोत, साथीदार आहोत, असंही पवार यांनी नमूद केले. सुप्रियाला माझ्यापेक्षा अधिक संधी मिळाल्या. त्यामुळे सहाजिक विविध प्रश्नांकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोण तयार झाला. आम्हाला हा दृष्टीकोण तयार करण्यासाठी वेळ लागल्याचे ते म्हणाले.
घरातील डायनिंग टेबलवरही लोकशाही
आमच्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आमचा डायनिंग टेबल. त्या डायनिंग टेबलवर अनेक क्षेत्रातील लोक आले आहे. याच डायनिंग टेबलवर वादविवाद झाले. वडिलांवर अनेकदा टीका झाली आहे. टीका करणे म्हणजे विरोधक नाही, तर तो एक विचार, असल्याचे आई-वडिलांनी शिकवले. त्यामुळे केवळ संसदेत लोकशाही नसून आमच्या डायनिंग टेबलवर देखील लोकशाही असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.