मुंबई : मुंबईतील प्रकल्पांना होणारा विरोध लक्षात घेऊन एमएमआरडीएने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवडी न्हावा-शेवा प्रकल्पाबाबत नागरिकांना माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जायकाने नियुक्त केलेल्या सल्लागारामार्फत प्रकल्पाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत नागरिकांना १५ सप्टेंबरला सादरीकरणाद्वारे माहिती देणार आहे.शिवडी ते नवी मुंबईतील विमानतळाला जोडणारा २२ किलोमीटर लांबीचा पूल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर हा प्रकल्प राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. परंतु कोणीही प्रकल्प उभारण्यासाठी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एमएमआरडीएने जपान शासन पुरस्कृत जायका कंपनीच्या मदतीने शिवडी-न्हावा-शेवा प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जायकाने सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. शिवडी-न्हावा-शेवा प्रकल्पाचा सुमारे १६ किलोमीटरचा भाग खाडीवरील पुलाचा असणार आहे. त्यामुळे शिवडी येथील पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भिती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या प्रकल्पाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी सल्लागार कंपनीमार्फत १५ सप्टेंबर रोजी शिवडी कोळी समाज हॉल, शिवडी कोळीवाडा येथे सकाळी १0.३0 वाजता सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय संस्था, सर्वसामान्य जनता, अशासकीय संस्थांना सहभागी होता येईल.नागरिकांना प्रकल्पाची पार्श्वभूमी, प्रकल्पाची उद्दिष्टे, पर्यावरण परिणाम इत्यादी मुद्द्यांवर १५ सप्टेंबर रोजी शिवडी कोळी समाज हॉल, शिवडी, कोळीवाडा येथे सकाळी १0.३0 वाजता सादरीकरण करण्यात येणार आहे.
शिवडी न्हावा-शेवा प्रकल्पाचे सादरीकरण
By admin | Published: August 26, 2015 2:01 AM