पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता नाट्यक्षेत्राला १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार? याचे वेध लागले आहेत. नाट्य परिषदेच्या विविध शाखांसह वैयक्तिक स्तरावर संमेलनाध्यक्ष पदासाठी सोमवारपर्यंत (दि. ३०) अर्ज मागविले होते. शाखांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीमधून ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेते व नाट्य परिषद मुंबईचे माजी अध्यक्ष मोहन जोशी अशी दोन नावे वैध ठरली आहेत. या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार? हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. परिषदेच्या घटनेनुसार निवड ही बिनविरोध पद्धतीने केली जाते. त्यासाठी विविध शाखांकडून अर्ज मागविले जातात. त्यानुसार सोमवारी प्राप्त झालेल्या अर्जांमधून डॉ. जब्बार पटेल व मोहन जोशी यांचे अर्ज वैध ठरले. पुणे व कोथरूड शाखेकडून मोहन जोशी तर मुंबईकडून डॉ. जब्बार पटेल यांचे नाव सुचविल्याचे कळते. मोहन जोशी यांनी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्षपद भूषविले आहे. दोन्हीही नाट्यक्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्वे असली तरी जोशी यांच्या तुलनेत डॉ. जब्बार पटेल यांचे पारडे जड राहण्याची शक्यता अधिक आहे. कारण मध्यवर्ती शाखेकडून डॉ. पटेल यांच्याच नावाला अधिक पसंती आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही दोन ठेवली जातील व त्यातील एका नावाची एकमताने निवड करण्यात येईल...............शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल व मोहन जोशी यांची नावे वैध ठरली आहेत. नियामक मंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत ही दोन नावे ठेवली जातील. मात्र बैठक कधी घेण्यात येईल हे अद्याप ठरलेले नाही.- प्रसाद कांबळी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई
शंभराव्या नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी यांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:55 PM
या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार? हा औत्सुक्याचा विषय...
ठळक मुद्देपरिषदेच्या घटनेनुसार निवड ही बिनविरोध पद्धतीनेजोशी यांच्या तुलनेत डॉ. जब्बार पटेल यांचे पारडे जड राहण्याची शक्यता अधिक