वर्धा :
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची यांची एकमताने निवड करण्यात आली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी अभिनंदन केले आहे.
साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी ही घोषणा केली. वर्ध्यातील स्वावलंबी शाळेच्या पटांगणावर ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संमेलन होईल. या निवडीकरिता मंगळवारी अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या सभागृहात अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला १९ पैकी १८ प्रतिनिधी उपस्थित होते.
अध्यक्षपदाकरिता आलेल्या आठ नावांवर चर्चा करण्यात आली. यातून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यक्रमांची रूपरेषाही ठरविण्यात आली आहे.
मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांची अभिवृद्धी कशी होईल, याचा विचार करण्याचा हा काळ आहे. संमेलनाध्यक्ष पदाच्या निमित्ताने याविषयी विचार करण्याची संधी मिळाली आहे. - न्या. नरेंद्र चपळगावकर
मावळते अध्यक्ष करणार ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनग्रंथप्रदर्शनाकरिता ३०० गाळ्यांची निर्मिती केली जाणार असून, २ फेब्रुवारीला मावळत्या अध्यक्षांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन तर ३ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीने संमेलन सुरु हाेईल.