लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रपती म्हणजे केवळ एक रबर स्टॅम्प आहे, असे वादग्रस्त विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने नवा वाद ओढवला आहे. राष्ट्रपती निवडीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राज यांनी हे विधान केले. वादग्रस्त विधान करतानाच, राज यांनी राष्ट्रपतींचा देशाला कधीच फायदा झालेला नाही, असेही म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. अशा वेळी राष्ट्रपती कुठे होते, या विषयांवर त्यांनी काय केले, नागरिक राष्ट्रपतींना पत्र पाठवत प्रश्नांविषयी विचारणा करतात. मात्र, त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर दिल्याचे ऐकिवात नाही. असे राष्ट्रपती आमच्या काय कामाचे, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्यांचे सरकार असते, त्यांचाच राष्ट्रपती असतो. परिणामी, काहीच फायदा होत नाही, अशी टीकाही राज यांनी केली आहे. राष्ट्रपती कोविंद झाले काय आणि गोपाळ झाले काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही, असे म्हणताच, राज यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावरही भाष्य केले आहे.
राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प - राज ठाकरे
By admin | Published: June 25, 2017 2:11 AM