- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी कृषितज्ज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपती करता येत नसेल तर स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करावे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे पर्याय त्यांना माहीत आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या पुणतांबे गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी ‘मातोश्री’ येथे ठाकरे यांची भेट घेतली. शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल शेतकऱ्यांनी ठाकरे यांचा सत्कार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, राष्ट्रपती पदासाठी भागवत यांना शिवसेनेची पहिली पसंती आहे. जर, भागवत यांच्या नावाबाबत भाजपाला अडचण असेल तर त्यांनी कृषितज्ज्ञ स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करावे. कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्यांवरील उपाय नसेल तर स्वामीनाथन यांना त्यासाठीचा पर्याय माहिती आहे. त्यांना राष्ट्रपती करावे, असा टोलाही ठाकरे यांनी मारला. मात्र, राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. अमित शाह यांच्याकडे एखादे चांगले नाव असेल तर त्याचा विचार करू, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले. शाह आज ‘मातोश्री’वरभाजपाध्यक्ष अमित शाह सध्या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शाह शनिवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठीच ते मातोश्रीवर जाणार आहेत. आधी सरसंघचालक मोहन भागवत आणि आता स्वामीनाथन यांचे नाव पुढे करत शिवसेना आपले नाणे वाजवून घेत असल्याचे चित्र आहे. एरव्ही शिवसेनेकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाऱ्या अमित शाह यांना राष्ट्रपती निवडणुकीतील गणित जुळविण्यासाठी अखेर ‘मातोश्री’वर जाणे भाग पडल्याचे चित्र आहे.