पुणे : जिल्हा परिषदेच्या चारपैकी तीन समित्यांच्या सभापतिपदी महिलांना संधी मिळाली आहे. त्यामुळे सभापतिपदी महिलाराज आले आहे. आज झालेल्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.इंदापूर तालुक्याच्या पळसदेव-बिजवडी गटातून निवडून आलेले प्रवीण दशरथ माने यांना बांधकाम आणि आरोग्य सभापतिपद, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा-वडगाव रासाई गटातून निवडून आलेल्या सुजाता अशोक पवार यांना कृषी व पशुसंवर्धन सभापतिपद, तसेच दौंड तालुक्याच्या केडगाव-पारगाव गटातून निवडून आलेल्या राणी हर्षल शेळके यांना महिला व बालकल्याण सभापतिपद, तसेच हवेली तालुक्यातील उरुळी देवाची-वडकी गटातून निवडून आलेल्या सुरेखा शैलेंद्र चौरे यांची समाजकल्याण सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे उपस्थित होते.या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या वंदना महादेव कोद्रे, जयश्री सत्यवान भूमकर, देविदास दत्तात्रय दरेकर, गुलाब विठ्ठल पारखे, पूनम नानासाहेब दळवी, तनुजा संदीप घनवट, अलका गणेश धानिवले, सागर किसन काटकर यांनी आपआपल्या गटातून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर इतर विषय समित्यांपैकी स्थायी समिती व जलसंधारण समितीचा कार्यभार अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्याकडे, त्याचबरोबर शिक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे देत असल्याची घोषणा सभागृहात विश्वासराव देवकाते यांनी केली. त्यामुळे विरोधी पक्षांनी अशी घोषणा करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे का? असा सवाल विरोध पक्षांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी ही घोषणा अनौपचारिक असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष कार्यभार हा १५ दिवसांनी देणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके, भाजपाचे गटनेते शरद बुट्टे-पाटील, कॉँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते शरद लेंडे यांनी मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)>आज झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेत सहकार्य केले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तसेच यापुढे विविध विषय समित्यांचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.- विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेत सभापतिपदी महिलाराज!
By admin | Published: April 04, 2017 1:21 AM