मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी प्राथमिक चर्चा झाली. मात्र, सध्या अर्जुनाप्रमाणे आमचे सारे लक्ष सध्या १० आणि १९ तारखांच्या निवडणुकांवर आहे. दरम्यानच्या काळात सहमतीने राष्ट्रपती निवडणुकीसाठी बैठक घेता येईल, असे पवार म्हणाले.राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सध्या मुंबईत आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच खरगे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सिल्व्हर ओक गाठले. जवळपास तासभर ही बैठक चालली. खरगे म्हणाले की, राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधकांचा मिळून एक उमेदवार असावा, असे सोनिया गांधी यांचे मत आहे. त्यानुसार त्यांनी केलेल्या सूचनेनुसार शरद पवार यांची भेट घेतली. लवकरच उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व समविचारी लोकांनी एकत्र येऊन चर्चा करणे आवश्यक आहे. त्याला विलंब करण्यात अर्थ नाही. अनेकांना विचारावे लागेल. मात्र, सध्या आमचे सगळे लक्ष अर्जुनाप्रमाणे माशाच्या डोळ्यावर आहे. सध्या राज्यसभा निवडणुकीसाठीची १० तारीख आणि पुढची विधान परिषदेची तारीख महत्त्वाची आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस