ठाणे : मागील तीन संमेलनांचे अध्यक्ष हे नेत्यांच्या शिफारशीनुसार झाले होते. ते सर्जनशील लेखक नव्हते. अशा अध्यक्षांमुळे संमेलनाचा दर्जा खालावतो, असा आरोप कवी अशोक बागवे यांनी केला. डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जयप्रकाश घुमटकर यांच्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदासाठी रावसाहेब कसबे, म. सु. पाटील याच्यांसारखे ज्येष्ठ साहित्यिक रिंगणात असते तर मी अर्जच भरला नसता, असे सांगत एकही तुल्यबळ साहित्यिक रिंगणात नसल्यानेच मी निवडणुकीला उभा राहिलो, असे सांगत घुमटकर यांनी आपल्या उमेदवारीचे समर्थन केले. हल्ली ज्वलंतपणे न लिहिता गुळमुळीत लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे, अशी टीकाही त्यांनी अन्य उमेदवार व साहित्यिकांचे नाव न घेता केली. न्यायमूर्ती रानडे यांनी जेव्हा ग्रंथकारांचे संमेलन घेतले, तेव्हा महात्मा फुले यांनी त्याचा उल्लेख ‘शेटजी भटजीं’चे संमेलन असा केला होता. ती परंपरा आजही कायम असून तिला शह देण्याची गरज आहे. घुमटकर यांच्यासारखे भूमिपुत्रच तो शह देऊ शकतात, असे वक्तव्यही बागवे यांनी केले. साहित्य महामंडळाच्या संचालकपदी सर्जनशील साहित्यिक असावे. परंतु महामंडळातील बरेचसे साहित्यिकच नाहीत. महामंडळात १३,७०० आजीव सभासद असूनही फक्त १,०७० सभासदांना मतदानाचा अधिकार असल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सभासद असूनही मला मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे महामंडळाचा कारभार उघडा पाडण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. संमेलनाध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रियाच मान्य नसल्याचे सांगत घुमटकर म्हणाले, माझ्यासमोर ज्येष्ठ-तुल्यबळ साहित्यिक नसल्यानेच मी यंदाच्या निवडणुकीत उभा राहिलो. अध्यक्षपदाच्या रिंगणात असूनही मतदारयादीत नाव नसल्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा मांडला. महामंडळाचे कार्यालय पुण्याहून नागपूरला नेण्याच्या घडामोडींवरही त्यांनी टीका केली आणि यातून पुण्याची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. अध्यक्ष झाल्यावर काय करणार, याची माहिती देणारे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले. (प्रतिनिधी)
नेत्यांच्या मर्जीनुसारच संमेलनाध्यक्ष
By admin | Published: November 03, 2016 3:36 AM