पुणे : गेल्या ८८ वर्षांमध्ये संमेलनाध्यक्षांच्या भाषणांमध्ये ज्या मुद्द्यांना साधा स्पर्शही झाला नाही, अशा विषयावरील अध्यक्षीय भाषण यंदा श्रोत्यांना ऐकायला मिळेल. समाजातील तळागाळातील प्रवाहाचा साहित्यातील सहभाग, सर्व चळवळींचा ऊहापोह भाषणात असेल, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.ते म्हणाले, अध्यक्षीय भाषण संमेलनाचा कणा असतो. त्यात केवळ साहित्यच नव्हे, तर सामाजिक, राजकीय बाबींची नोंदही व्हायला हवी. कारण, साहित्याचा प्रवाह सर्वदूर पोहोचलेला असतो. त्यामुळेच मी अत्यंत विचार आणि अभ्यास करून ११० पानांचे अध्यक्षीय मनोगत तयार केले आहे. त्यामध्ये साहित्याच्या प्रत्येक प्रवाहातील, स्तरांतील घटकांची दखल घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपापल्या भाषेमध्ये उत्तम वैचारिक लेखन करणारे तरुण खेड्यापाड्यात पाहायला मिळतात. परंतु ते प्रकाशझोतात येत नाहीत. आजवर कोणत्याही भाषणांमध्ये या प्रवाहांचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. साहित्याच्या व्यापकतेला न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे अध्यक्षीय भाषण इतिहास रचणार आहे. ते पुढील ५० वर्षे लोकांच्या स्मृतिपटलावर कोरले जाईल. विरोधाचे शस्त्र आता प्रत्येक जण उठून हाती घेत आहे; पण, हा विरोध माझे विचार बदलू शकणार नाही. मी सत्यवादी असल्याने समाजातील आणि साहित्यातील सत्य परखडपणे मांडण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अध्यक्षाला बोलण्यासाठी केवळ १५ मिनिटे देणे, योग्य नाही. त्यामुळे मी माझी नाराजी साहित्य महामंडळाकडे नोंदवली आहे. मुलाखतीतील काही वेळ भाषणासाठी देण्यासंदर्भातही मी मागणी केली आहे.- श्रीपाल सबनीस, नियोजित अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन‘मॉर्निंग वॉक’चे दोन अर्थसनातन संस्थेचे संजीव पुनावळेकर यांनी सबनीस यांना ‘मॉर्निंग वॉक’चा सल्ला दिला. त्यावर पवार म्हणाले, त्याचे दोन्ही बाजूने अर्थ निघतात. धमकीपण होऊ शकते आणि सल्लाही होऊ शकतो. परंतु असा सल्ला देऊन कोणीही राज्यातील वातावरण गढूळ करूनये.वाद थांबवावा - अजित पवारलोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षांच्या वक्तव्यांचा वाद जास्त ताणू नका, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे व्यक्त केले. महापालिका शिक्षण मंडळातर्फे आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षीय भाषण रचेल इतिहास!
By admin | Published: January 10, 2016 1:00 AM