नाशिक : सिग्नलवर भरधाव वेगाने धावणारी वाहने. एक सिग्नल थांबत नाही तोच दुसरा पडतो. सामान्य पादचाऱ्याला रस्ताच ओलांडता येत नाही. वाहनांची संख्या रोडावली की मग पादचाऱ्याला सिग्नलवर रस्ता ओलांडता येतो. शहरवासियांना हे चित्र नवे नाही. मात्र आता त्यावर नवीन स्मार्ट पर्याय नाशिक स्मार्ट सिटीने शोधला आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पेलिकन सिग्नल बसवण्यात येणार आहेत.
अर्थातच त्याचा प्रयोग त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान साकारलेल्या स्मार्टरोडवर हे पेलिकन सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत. रस्त्यांवर चालणे हे पादचाऱ्यांचा पहिला हक्क मानला जातो. त्यामुळे पादचाऱ्यांचा हा हक्क अबाधित ठेवण्यासाठी विदेशात वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जातात.
नवीन रस्ता तयार करताना त्याशेजारी पदपथ असलेच पाहिजेत आणि त्याची लांबी रुंदीही पुरेशी असली पाहिजे यासाठी आता रोड डिझायनिंग संकल्पनाही राबविली जात आहे. मात्र, सिग्नलवर वाहनतळावर होणारी अडचण लक्षात घेऊन राबविण्यात येणारी संकल्पना प्रथमच राबविण्यात येणार आहे.
सिग्नल न पाहणाऱ्यांचे करायचे काय? स्मार्ट सिटीची संकल्पना चांगली असली तरी नाशिकमध्ये ती कितपत यशस्वी ठरेल याबाबत मात्र मतभेद आहेत. नाशिकमध्ये सिग्नल असूनही त्याचा उपयोग हाेत नाही. सिग्नलचे दिवे न बघताच वाहने दामटली जातात अशावेळी पादचाऱ्याने बटन दाबून सिग्नल थांबविण्याचा प्रयत्न केला तरी तो कितपत उपयुक्त ठरेल याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने करतात पार्कसिग्नलवर पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग करून सोय केलेली असते. मात्र, तरीही वाहने त्यावर उभी राहत असल्याने रस्ता ओलांडणे कठीण होते. चहूबाजूंचे सिग्नल सुरू झाल्यानंतर पादचाऱ्यांना चालणे कठीण होते. त्यावर आता पेलिकन सिग्नलची मात्रा शोधण्यात आली आहे. सिग्नलवरील बटणचा वापर करून सिग्नल थांबवून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येईल अशी व्यवस्था असणार आहे.