मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विस्तार करावा यासाठी पक्षातूनच त्यांच्यावर दबाव वाढत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्रीही विस्तारासाठी अनुकूल असले तरी विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर ते विस्तार करतील, असे दिसते.मुख्यमंत्री ९ जूनपासून सहा दिवस विदेश दौºयावर जात आहेत. तेथून परतल्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार नक्की होईल, असे सूत्रांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ सहकारी विस्तारासाठी विशेष आग्रही असल्याचे म्हटले जाते. या शिवाय, रेंगाळलेल्या विस्ताराबाबत पक्षामध्ये नाराजीचे सूर आहेत. विधानसभेची निवडणूक आॅक्टोबर २०१९ मध्ये होणार आहे. लगेच विस्तार केला तर नवीन मंत्र्यांना १५ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल आणि त्यांना काही कामगिरी करून दाखविता येईल. विस्तार आणखी रेंगाळला तर विस्ताराचा हेतूच पराभूत होईल, अशी भाजपांतर्गत भावना आहे. २०१४ च्या निवडणुकीत अन्य पक्षातून भाजपात येऊन आमदार झालेल्यांची संख्या मोठी होती पण त्यापैकी कोणालाही मंत्रीपद दिले गेले नाही. आता त्यांच्यापैकी एकदोघांना मंत्री केले तर भाजपात बाहेरून आलेल्यांना चांगली संधी मिळते, असा संदेश जाईल, असाही सूर आहे. शिवसेनेला आपल्या काही मंत्र्यांना वगळून नवीन चेहºयांना संधी द्यायची आहे का, या बाबत फडणवीस हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विस्तारापूर्वी चर्चा करणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:42 AM