- दीपक भातुसे/मनोज मोघेमुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीत कोणती जागा कोणत्या पक्षाला द्यायची आणि उमेदवार कोण असले पाहिजेत यावरून प्रचंड धुसफूस विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू असून स्थानिक नेत्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांना अक्षरश: हैराण केले आहे. ‘खालून दबाव, वरचे हैराण’ असे चित्र कायम असून त्यामुळेच दोन्हींचा फॉर्म्युला मंगळवारीदेखील ठरू शकला नाही. होळी, धुळवडीनंतर वादाचे रंग कमी होतील अशी आशा व्यक्त केली जात असताना हे रंग अधिक गडद होत असल्याचे दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. शरदचंद्र पवार गट व ठाकरे गट यांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. अजित पवारांनी रायगडमधून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली.
मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच राष्ट्रवादीचे शिरुरमध्ये उमेदवार असतील. ‘बारामतीत तुमच्या मनातलाच उमेदवार राहील असे सांगत अजित पवारांनी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले. माजी मंत्री महादेव जानकर यांना परभणीतून महायुतीतर्फे रिंगणात उतरविले जाईल.
महायुती : सत्तेसाठी एकत्र आले ‘मित्र’ पण जागावाटपाचे जुळेना अजून ‘सूत्र’महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी अद्यापही ९-१० जागांवर महायुतीचे घोडे अडले आहे. नाशिक : हेमंत गोडसेंसाठी शिवसेना आग्रही. भाजप, राष्ट्रवादीचीही मागणी. छत्रपती संभाजीनगर : शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच आहे. सातारा : राष्ट्रवादीचा आग्रह पण उदयनराजेंना हवे कमळच.दक्षिण मुंबई : भाजप की शिवसेना? की मनसेला सामावून घ्यावे, यात फसली. ठाणे : भाजप व शिवसेना दोघांनाही हवे. भाजपकडून संजीव नाईक यांचे नाव.हिंगोली : शिवसेना मागे हटायला तयार नाही अन् भाजपही अडून बसला आहे.पालघर : शिवसेना अडून बसलेली असताना भाजपने जोर लावला आहे. आ. हितेंद्र ठाकूर यांनी जागा भाजपला दिली तरच तुमच्यासोबत आहे, असे कळविले असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग : उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत (शिंदे गट) यांना लढायचे आहे. भाजप ही जागा सोडायला तयार नाही. धाराशिव : तिन्ही पक्ष दावा सांगत आहेत. अंतर्गत वादही बरेच आहेत. माढा : भाजपचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना असलेला मोहिते पाटलांचा विरोध कायम आहे. अमरावती : नवनीत राणा नकोच, असे साकडे तेथील भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना घातले.
३०-१३-५ असा असू शकतो फॉर्म्युला२८ मार्चला आम्ही तिघे जागावाटप जाहीर करू, असे अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. महायुतीत भाजप ३०, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ५ जागा असा फॉर्म्युला अंतिम होऊ शकतो.
मविआ : तीन जागा, तीन पक्ष, तिढा सुटेना; चौथा भिडूही पत्ते काही खोलेनामहाविकास आघाडीत ३ जागांवरून तिढा कायम असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतरही सांगलीच्या जागेचा वाद शांत झालेला नाही. दुसरीकडे जागावाटपाच्या अनेक बैठकांनंतरही भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी आणि दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेवरून शिवसेना व काँग्रेस यांच्यातील चढाओढ कायम आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर आघाडीला दाद देत नसल्याचे दिसत आहे.सांगली : या जागेवरून सध्या काँग्रेस आणि शिवसेनेत अबोला आहे. शरद पवारांनी या जागेबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, अशी विनंती काँग्रेसने केल्यानंतर सोमवारी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र शरद पवारांच्या विनंतीनंतरही शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही. सांगलीबाबत मंगळवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांशी चर्चा केली.दक्षिण-मध्य मुंबई : काँग्रेस यासाठी आग्रही आहे. तेथे मुंबई अध्यक्ष आ. वर्षा गायकवाड यांच्या रुपाने तगडा उमेदवार आपल्याकडे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तर सांगलीप्रमाणे (चंद्रहार पाटील) दक्षिण मुंबईतही ठाकरे गटाने अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केले. काँग्रेसने उत्तर-पूर्व मुंबईत लढावे असे शिवसेनेचे म्हणणे आहे. भिवंडी : या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम. nगडचिरोली : उमेदवारी न मिळालेले माजी आमदार डॉॅ. नामदेव उसेंडी यांनी भाजपत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
वंचित आज करणार भूमिका जाहीरवंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेणार असून, या बैठकीतील निर्णय बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत, अशी माहिती मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.