हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:06 PM2024-10-08T16:06:20+5:302024-10-08T16:07:36+5:30
महाराष्ट्रात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. हरियाणात २ पक्षांची समोरासमोर लढत होती. महाराष्ट्रात दोन आघाड्यांची निवडणूक आहे असं चव्हाणांनी सांगितले.
मुंबई - हरियाणा विधानसभेच्या निकालाचे महाराष्ट्रातील राजकारणावर परिणाम होईल का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे मत मांडले आहे. इतर राज्यातील निकालाचा परिणाम कार्यकर्त्यांवर होतो. परंतु महाराष्ट्राची निवडणूक वेगळी आहे. राज्यातील ५० खोके हा विषय इतर राज्यात नव्हता. राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालाय ही विशेष परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे उद्योग बाहेर जातायेत हा मुद्दाही इतर राज्यात नव्हता. शेतकरी आत्महत्या कुणीही विसरू शकत नाही. महाराष्ट्राची निवडणूक वेगळी असेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हरियाणाच्या निकालाचं विश्लेषण करावे लागेल. तिथल्या लोकांशी बोलावं लागेल. मी २००७-०८ मध्ये हरिणायाचा प्रभारी होतो त्यामुळे ते राज्य मला माहिती आहे. जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षेप्रमाणे एनसी-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले. जम्मूत काही प्रमाणात भाजपाला प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार जम्मू काश्मीरात येतेय ही आनंदाची बाब आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही निवडणूक झाली. लोकांनी निवडलेले सरकार राज्यात आले आहे. या दोन्ही राज्यातील निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा, उत्साह हे स्वाभाविक असते. जेव्हा निवडणूक पुढच्या आठवड्यात घोषित होईल तेव्हा खरे मुद्दे घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडी लोकांसमोर जाईल. लोक महाराष्ट्रातील मुद्द्यांवर मतदान करणार आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. हरियाणात २ पक्षांची समोरासमोर लढत होती. महाराष्ट्रात दोन आघाड्यांची निवडणूक आहे. २-३ पक्षांच्या या आघाड्या आहेत. त्यामुळे तिथला परिणाम जागावाटपावर होईल असं नाही. जागावाटप केवळ निवडून येण्याच्या क्षमतेवर होते, कोण मोठा भाऊ, कोण छोटा भाऊ याला अर्थ नाही. भ्रष्ट युतीला सत्तेतून घालवायचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा जिंकणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी सर्वात सक्षम उमेदवार निवडून आणायचे आहे. जागावाटपावर आतापर्यंत अतिशय सुरळीतपणे चर्चा सुरू आहे. हरियाणा निकालाचा काही परिणाम होईल असं वाटत नाही असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले.
दरम्यान, काँग्रेस पक्षातील हरियाणातील नेते त्यांचे काही आक्षेप आहेत ते निवडणूक आयोगासमोर मांडतील. हरियाणातील निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. ५० पेक्षा जास्त जागा आणि स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र निकालांमध्ये ते होताना दिसत नाही अजूनही अंतिम निकालापर्यंत थांबले पाहिजे. मात्र ट्रेंड पाहिले तर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसतंय. जम्मू काश्मीरमध्ये एनसी आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाचा पराभव झाला आहे. आता जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करणे हे काम असेल, जे मध्यंतरी केंद्रशासित केले होते. त्यामुळे संघर्षाची ठिणगीही पडू शकेल. त्यामुळे राज्य आणि केंद्राचा संघर्ष पेटू शकेल अशी शक्यता चव्हाणांनी वर्तवली.
महाराष्ट्रात मतभेद नाहीत
आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. जिथे अडचण असेल त्या जागांवर चर्चा मागे ठेवल्या आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखाली जो महाराष्ट्रात नंगानाच झाला, ज्याला मोदी-शाह जबाबदार आहेत. त्यामुळे जागावाटपावर काही परिणाम होणार नाही. जागा मेरिटवरच वाटप होतील. जिंकण्याची क्षमता ज्या पक्षाची, उमेदवाराची आहे त्याला तिकिट दिले जाईल असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करणार
केंद्रशासित प्रदेश म्हणून दिल्लीहून राज्य चालवणं अगदी चुकीचे होते. त्यामुळे जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे याला प्राधान्य असेल, कलम ३७० चा निर्णय घेतला असला तरी ते अस्थायी स्वरुपाचे कलम होते. ते निरस्त करायचे होतेच, परंतु राज्याचे त्रिभाजन करण्याची गरज नव्हती. जम्मू काश्मीरला केंद्रशासित करण्याची गरज नव्हती. जेव्हापासून हा निर्णय घेतला तेव्हापासून आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये दिल्लीचं साम्राज्य चालू होते, ते तिथल्या लोकांना पसंत नव्हते त्यामुळे भाजपाविरोधात निकाल जाणार हे स्पष्ट होते. केंद्र सरकार विशेषत: गृह मंत्रालय लोकांच्या इच्छेविरोधात काही करणार नाही अशी अपेक्षा आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.
.