मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 12:25 PM2024-09-29T12:25:53+5:302024-09-29T12:26:51+5:30
उद्धव ठाकरे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून याठिकाणी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत निवडणुकीचा तयारी आढावा घेणार आहेत.
नागपूर - लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जागा कमी निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राइक रेटप्रमाणे जास्त निवडून आल्या आणि झीरो सदस्य असलेल्या काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या त्यामुळे थोडंस कळत नकळत उद्धव ठाकरे दबावात आल्याचे दिसतात. मात्र कुणीही २०१९ विसरू नये असा गर्भित इशारा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे. कळमेश्वर तालुक्यात आज उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उद्धाटनाला येणार आहेत. या निमित्ताने पूर्व विदर्भातील विधानसभा निवडणुकीचा तयारी आढावा ठाकरेंकडून घेण्यात येत आहे. याठिकाणचे इच्छुक उमेदवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरेंकडून संभाव्य उमेदवारांना संकेत द्यावेत यासाठी माझा आग्रह असणार आहे असं संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी सांगितले.
माध्यमांना मुलाखत देताना भास्कर जाधव म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीतील चर्चेला बाधा येईल असं मी बोलणार नाही परंतु काँग्रेस, नाना पटोले काय म्हणतात याकडे मी बघत नाही. माझा पक्ष काय सांगतो, माझ्या पक्षाची ताकद या भागात किती आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करायला बैठकीला तयार आहे. १९९० ते २०१९ पर्यंत पूर्व विदर्भ भागात शिवसेनेचे किती निवडून आलेत याचा सगळा मी अभ्यास केला आहे. त्या त्या वेळचे सर्व लांब असलेले लोक मी जवळ केलेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद किती उभी राहिलीय हे काही पक्षांना माहिती नसावं म्हणून ते तशी विधाने करत असतील असं सांगत त्यांनी नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी एकही जागा मित्रपक्षाला सोडणार नाही या पटोलेंच्या विधानावर आक्षेप घेतला.
तसेच नाना पटोले काय म्हणतायेत, त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. नाना पटोलेंचा अभ्यास कमी असेल. या १२ मतदारसंघात शिवसेना अस्तित्वात आहे, त्यांना जर शिवसेना दिसत नाही तर हा त्यांचा भ्रम आहे. नागपूर जिल्ह्यातील न्यायिकदृष्ट्या शिवसेना-भाजपानं २०१९ मध्ये १४ जागा जिंकल्या होत्या. भलेही आज आम्ही एकत्र नसू पण नैतिकतेने पूर्व विदर्भातील २८ पैकी १४ जागांवर आमचा दावा कायम राहणार आहे. विदर्भातील ६२ जागा आहेत त्यापैकी २८ जागांचा संपर्क नेता मी आहे. उर्वरित जागा खासदार अरविंद सावंत यांच्याकडे आहेत. ते किती जागा मागतायेत यावर चर्चा नाही परंतु मी माझ्या कार्यक्षेत्रातील १४ जागा मागतोय. नागपूर आणि रामटेक मिळून १२ जागा आहेत त्यातील किमान ४ जागा मिळायलायच हव्यात. पक्षातंर्गत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे हा आमचा आग्रह राहणार आहे. कारण विदर्भातील संपर्क नेता म्हणून इथल्या जनतेशी तळमळ, विदर्भातील जनतेशी भावना, पक्षाचे जे पदाधिकारी, सहकारी आहेत त्यांच्यात शिवसेना काय आहे, विदर्भातील लोकांना शिवसेना का हवीय हे मी अनुभवतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे मी आग्रह धरणार आहे तुम्ही अंतर्गत सांगा, जाहीर सांगितले नाही तरी चालेल असा आग्रह भास्कर जाधव उद्धव ठाकरेंकडे करणार आहेत.
दरम्यान, ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेसची राज्यात एकही जागा नव्हती. बाळू धानोरकर जे निवडून आले होते दुर्दैवाने त्यांचे निधन झाले होते. शरद पवारांच्या गटाचे ४ खासदार होते, त्यातील १ तिकडे गेले ३ पवारांसोबत राहिले. उद्धव ठाकरेंच्या १८ जागा निवडून आल्या होत्या परंतु त्यातील ६ खासदार ठाकरेंसोबत राहिले. लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जागा कमी निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राइक रेटप्रमाणे जास्त निवडून आल्या. आणि झीरो सदस्य असलेल्या काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या त्यामुळे थोडंस कळत नकळत उद्धव ठाकरे दबावात आल्याचे दिसतात. मात्र दबावात येण्याची गरज नाही कारण उद्धव ठाकरेंमुळेच महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्यात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र तेच बघतोय. तुम्ही कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न जरूर करा परंतु कमी जागा घेण्याचा विचार करण्याची गरज नाही. २०१९ ला उद्धव ठाकरेंच्या जागा जास्त होत्या, त्याखाली राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेस होती. आज लोकसभेला काँग्रेसच्या जागा वाढल्या त्यामुळे ते १२ पैकी एकही जागा देणार नाही अशी भाषा करतायेत. २०१९ कुणीही विसरू नये हे मला काँग्रेसला सांगायचे आहे असा गर्भित इशारा भास्कर जाधव यांनी काँग्रेसला दिला.