अनिकेत घमंडी, डोंबिवली९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, याकरिता ठाण्यातील शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्यांना दूरध्वनी केला होता, अशी माहिती स्वत: घुमटकर यांनीच ‘लोकमत’ला दिली. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता राजकीय नेत्यांमार्फत दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप घुमटकर यांनी केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार प्रा. प्रवीण दवणे यांना यावेळेस संधी द्यावी, पुढच्या वेळेस तुमचा विचार करू. तुम्ही दोघे माझ्या कार्यालयात या. आपण बसून निर्णय घेऊ, अशा शब्दांत शिवसेनेच्या या नेत्याने घुमटकर यांना उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली. दवणे आणि घुमटकर हे ठाण्यातील एका महाविद्यालयात एकत्र काम करीत होते. त्यावेळी घुमटकर हे उपप्राचार्य, तर दवणे हे प्राध्यापक होते. दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ठाण्यातील या नेत्याने फोन केला होता, असे घुमटकर म्हणाले. नेत्याने हा प्रस्ताव ठेवल्यावर घुमटकर त्यांना म्हणाले की, मी सिनीअर असून दवणे यांना यंदा माघार घ्यायला सांगा. त्यानंतर, पुढील वर्षी मी त्यांना पाठिंबा देतो. आता माझी विजयाच्या दृष्टीने सगळी तयारी झाली असून मीच निवडणूक जिंकेन, असा मला विश्वास वाटत आहे. आपला फोन निवडणुकीतील माघारीकरिता ‘दबावतंत्र’ समजावे की काय, असा सवाल घुमटकर यांनी त्या नेत्याला केला असता आपण सहज फोन केला असल्याचे त्या नेत्याने सांगितले. फोन करणारे हे शिवसेना नेते हे माझ्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्त्व असून मला ज्येष्ठ आहेत. मात्र, त्यांनी या कारणासाठी मला फोन केला, याचे तीव्र दु:ख झाले. साहित्य क्षेत्रातील निवडणुकीत राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करण्याची काहीच गरज नाही, असे घुमटकर म्हणाले. शिवसेनेतील कोणत्या नेत्याने आपल्याला फोन केला, असा सवाल वारंवार केला असता घुमटकर यांनी महापौरपदापासून खासदारपदापर्यंत वाटचाल केलेला व वेगवेगळ्या पक्षांत संचार करून पुन्हा शिवसेनेत आलेला तो बडा नेता आहे, असे सांगितले.
उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेना नेत्याचा दबाव
By admin | Published: November 11, 2016 3:13 AM