कल्याण : कल्याण-मलंगगड बसला लागलेल्या आगीच्या घटनेत चालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात सादर झालेल्या अहवालावर मंगळवारच्या परिवहन समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रसंगावधान दाखविणाऱ्याला दोषी ठरविणारा अहवाल फेटाळण्यात यावा, अशी मागणी लावून धरल्याने सभापती रवींद्र कपोते यांनी सक्षम तज्ज्ञामार्फत पुन्हा चौकशी करून, नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. ३ आॅक्टोबर २०१४ रोजी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली परिसरात कल्याण-मलंगगड या केडीएमटीच्या बसला आग लागली होती. या भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. चालक वीरेंद्र परदेशी आणि वाहक मनोहर मडके यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील १३ प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल मंगळवारच्या सभेत ठेवण्यात आला होता. त्यात अपघातास चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला. टाटा कंपनीच्या बसेसला आगी लागल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. याला सर्वस्वी कार्यशाळा व्यवस्थापक जबाबदार असताना चालकाला दोषी का ठरविले, असा सवाल सभेत उपस्थित करण्यात आला. संबंधित टाटा कंपनीकडून देण्यात आलेल्या अहवालावरही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. हा अहवाल कंपनीच्या सेल्स मॅनेजरने बनविल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. त्यांना अहवाल बनविण्याचा अधिकार आहे का. संबंधित अहवाल खोटा आहे. तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली़ यावर अहवाल फेटाळताना संबंधित चालकाला तत्काळ सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश सभापती कपोते यांनी प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)
प्रसंगावधानी चालकाला ठरवले दोषी
By admin | Published: December 18, 2014 5:26 AM