मुंबई : ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित आरोपींना कल्याण, परभणीतून अटक करण्यात आली असून प्रलोभन दाखवून युवकांची फसवणूक केली जात आहे. इसिसच्या संपर्कात येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या विषयाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. मुंडे यांनी विधान परिषदेत नियम २८९ अन्वये राज्यातील ‘इसिस’चा वाढत्या प्रभाव रोखण्याची मागणी करत स्थगन प्रस्ताव मांडला. ‘इसिस’कडून युवकांना विविध प्रलोभने दाखवून फसवण्यात येत आहे. ‘इसिस’ राज्यात हातपाय पसरत असल्याचे मुंडे म्हणाले. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसल्याने बेरोजगार तरुणांची संख्या मोठी असून हेच युवक ‘इसिस’चे लक्ष्य आहेत. गुन्हेगारी वतुर्ळातून तुरुंगातील कैद्यांना ‘इसिस’कडे वळवण्यात येत आहे. विवाहसंस्था स्थापन करुन तरुण-तरुणींना फसवून त्यांचे धर्मांतर करुन त्यांना '‘इसिस’च्या विचारांकडे वळविले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही ठोस भूमिका घेत ‘आयसिस’चा प्रभाव रोखण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली. (विशेष प्रतिनिधी)
‘इसिस’चा प्रतिबंध करा-मुंडे
By admin | Published: July 26, 2016 2:53 AM