अकोला : भाजपा-शिवसेनेची युती यंदा होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत अखंड राहते का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षातील बंडखोरांना थोपवण्यासाठी युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहे. युती झाल्यास तिकि टाच्या शर्यतीतून बाद होण्याच्या धास्तीने भाजपा-शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील फेरबदलाचे परिणाम सर्वच पक्षांवर झाले. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्याच्या व शहराच्या राजकारणात शिवसेनेला गृहीत धरणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. युतीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका ध्यानात घेता, स्वबळावर राजकीय ताकद दाखवण्यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येते. नगरपालिका निवडणुकीची पुनरावृत्ती? नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप होईपर्यंत, युतीच्या संदर्भात दोन्ही पक्षात केवळ चर्चेचा देखावा सुरू होता. भाजपा-सेनेकडून युतीची घोषणा झाली तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अर्थातच ही पूर्वनियोजित खेळी होती. मनपा निवडणुकीसाठी जरी युतीच्या चर्चेला उधाण आले असले, तरी ऐनवेळेवर नगरपालिका निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. आघाडीचेही भिजत घोंगडेशिवसेना-भाजपाप्रमाणेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या मुद्द्यावर केवळ चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येते. २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असली, तरी अजून सामसूमच आहे.
बंडखोरी रोखण्यासाठी ‘युती’चे गुऱ्हाळ चालू
By admin | Published: January 26, 2017 2:18 AM