मुंबई : नेपाळमार्गे देहविक्रयासाठी येणाऱ्या मुलींची तस्करी रोखण्यासाठी आपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून पाठपुरावा करू, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सांगितले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे आज पवई येथील एमटीएनएलच्या इमारतीत ‘बालकामगार व अवैध मानवी वाहतूक’ या समस्येवर एक दिवसीय परिषद झाली. त्या वेळी उपस्थित नेपाळमधील प्रतिनिधींनी या प्रश्नावर परिषदेचे लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत मुलींच्या अवैध वाहतुकीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव ए.एन. त्रिपाठी, उत्तराखंड महिला आयोगाच्या अध्यक्षा सरोजिनी कैंतुरा, केरळ बाल हक्क आयोगाच्या सदस्या ग्लोरी जॉर्ज, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्या सचिव अनिता वर्मा, उत्तराखंड बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव विनोद प्रसाद रातौरी, चंदिगड बाल हक्क आयोगाचे सदस्य प्रमोद शर्मा, राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या सहायक संचालक अनिता विनायक, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे संचालक संजय माकवान, नेपाळ येथील एमएआयटीआय संस्थापक अनुराधा कोईराला आदी उपस्थित होते. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत बेरोजगारीवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असा दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्र म राबविण्यात येणार आहे. या कार्यक्र माला राज्यातील बालगृहे तथा बालकाश्रमांशी जोडले जाईल. या बालकाश्रमांतील मोठ्या मुलांना कौशल्यविकास विषयक प्रशिक्षण देऊन ते सज्ञान झाल्यानंतर त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी ग्रामविकास आणि महिला-बालविकास विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मुलींची होणारी तस्करी रोखणार
By admin | Published: November 22, 2015 2:22 AM