मुंबई - उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करताना, कर्जमाफीची प्रक्रिया दोनच महिन्यात पूर्ण करण्याचे टार्गेट महाविकास आघाडीने ठेवल्याचे अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कर्जमाफीच्या मुद्दावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चोख प्रत्युत्तर दिले. आधीच्या फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफी केली. मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या. तब्बल 26 वेळा कर्जमाफीच्या आदेशात बदल करण्यात आले. त्यामुळे शेतकरी गोंधळून गेले होते. दररोज नवनवीन आदेश येत होते. तसेच भाजपने केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया दीड वर्षे नव्हे तर सरकार जाईपर्यंत सुरू होती, असा टोला अजित पवार यांनी लागवला.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया आम्ही तीन महिन्यात संपविणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ दोनच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे दोन महिन्यात शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने अंतर्गत, शेतकऱ्यांनी 2015 ते 2019 या कालावधी घेतलेल्या 2 लाखापर्यंतच्या कर्जाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.