पुणे : तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाल्याने भावात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे स्वस्तात तूरडाळी दिली जात असली, तरी घाऊक बाजारावर त्याचा परिणाम झालेला नाही. तूरडाळीच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत क्लिंटलमागे सुमारे ७०० रुपयांची वाढ झाली आहे. पुन्हा एकदा तूरडाळीने प्रतिकिलो १६० रुपयांचा टप्पा पार केला.जप्त केलेली, तसेच आयात करण्यात आलेली तूरडाळ १०० रुपये प्रतिकिलो भावाने नागरिकांना देण्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री व पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. विविध शहरांत स्वस्तातील डाळीची विक्री सुरू झाली. तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील़, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, हा अंदाज फोल ठरला आहे.डिसेंबरअखेरपासून गावरान तूरडाळ बाजाराततूरडाळीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात तुटवडा जाणवू लागला आहे. साधारणत: डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून गावरान तूरडाळीची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हे भाव असेच चढे राहतील, असे डाळींच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यात तूरडाळीचे सरासरी भाव प्रतिकिलो १२५ ते १५५ रुपये एवढे होते. त्यात सुमारे ७०० रुपयांची वाढ झाली असून, हे भाव १६५ रुपयांपर्यंत गेले आहेत.पुढील काही दिवस तुटवडा कायम राहणार असल्याने काहीही उपाययोजना केल्या, तरी तूरडाळीचे भाव खाली येणार नाहीत. त्यासाठी नवीन हंगामाची वाट पाहावी लागणार आहे. नवीन हंगामातही तूरडाळीच्या उत्पादनानुसार भावावर परिणाम जाणवेल, असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
तूरडाळीच्या भावात पुन्हा वाढ
By admin | Published: November 15, 2015 1:18 AM