- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सिंचन प्रकल्पांच्या किमती कोट्यवधी रुपयांनी वाढल्या म्हणून आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या तेव्हाच्या भाजपाने आता सत्तेत आल्यानंतर वीज प्रकल्पांच्या उभारणीची किंमत कोट्यवधी रुपयांनी वाढल्याने त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महानिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर आणि कोराडी येथील औष्णिक वीज प्रकल्पासह परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील संचांच्या उभारणीसाठी लागलेल्या वाढीव खर्चासह सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पाचा संच आठ आणि नऊच्या उभारणीसाठी २००८ मध्ये ५ हजार ५०० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आज ७ हजार ४ कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याचा अर्थ खर्च १ हजार ५०४ कोटी रुपयांनी वाढला.परळी औष्णिक विद्युत प्रकल्पातील जुन्या संचाच्या जागी २५० मेगावॅट क्षमतेचा नवीन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या २०८१ कोटी रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजित खर्चास आज मान्यता देण्यात आली. मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महानिर्मिती कंपनीच्या कोराडी येथील औष्णिक वीज प्रकल्पातील संच क्रमांक ८, ९ आणि १० च्या उभारणीसाठी लागलेल्या सुधारित अंदाजित खर्चासह २ हजार १४६ कोटी ५९ लाख रुपये वाढीव प्रकल्प खर्चास आज मंजुरी देण्यात आलीे.