मुंबई : दिवाळीच्या काळात डाळींच्या विशेषत: तूरडाळींच्या दरात झालेली प्रचंड भाववाढ एका सुनियोजित कारस्थानाचा भाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना या प्रकाराची माहिती होती, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.अन्न व नागरी पुरवठा तेलबिया व खाद्यतेलावरील निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये डाळींचा समावेश नव्हता. परंतु, निर्णय घेताना त्यामध्ये अचानक डाळींचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना या प्रकाराची संपूर्ण कल्पना होती व या प्रस्तावावर त्यांच्यादेखील स्वाक्षरी आहेत. डाळींवरील निर्बंध मागे घेताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होती. परंतु, केंद्र व राज्यातील मोठ्या नेत्यांच्या प्रभावामुळे ही परवानगी घेण्याची अट नियमबाह्य पद्धतीने शिथिल करण्यात आली. निर्बंध मागे घेणे हे एक व्यापारी कारस्थान होते आणि भारतीय जनता पार्टीचा केंद्रातील एक वरिष्ठ नेता या कटात सामील होता, असा आरोपही सावंत यांनी केला. डाळ भाववाढीचे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीपोटी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी त्यांच्याच विभागाचे सचिव दीपक कपूर यांना ४ पानांचे पत्र लिहून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी कितीही सावरासावर केली तरी ते या प्रकारातून अंग काढू शकत नाहीत. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनीतर डाळींचे साठे असलेल्या एका गोदामालाही भेट दिली. ही भेट पाहणीचा प्रकार नव्हता तर त्यामागेही मोठे गुपित आहे. पुरेशी कागदपत्रे जमा झाली की त्याचाही गौप्यस्फोट आपण करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘डाळीची भाववाढ हा तर सुनियोजित कट’
By admin | Published: January 20, 2016 2:32 AM