लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटो, शेवगा व ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या भावांत वाढ झाली. इतर फळभाज्यांची आवक माफक प्रमाणात असल्याने भावही स्थिर राहिले. पालेभाज्यांची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने भाव तेजीतच आहेत. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १४० ते १५० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत २५ ते ३० ट्रक आवक कमी झाली आहे. काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी बाजारात आवक घटली असून, काही फळभाज्यांसह पालेभाज्यांचे भावही तेजीत आहेत. रविवारी टोमॅटोचे भाव प्रतिदहा किलोमागे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत गेले; तसेच शेवगा ४४० ते ५०० आणि ढोबळी मिरचीला ३५० ते ४०० रुपये भाव मिळाला. बाजारात रविवारी टोमॅटोची केवळ ३.५ ते ४ हजार पेटी आवक झाली, तर आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवग्याची आवक झाली. इतर फळभाज्यांची आवकही तुलनेने कमी होत असली, तरी भाव टिकून राहिले.फुलांना मागणीगुरुपौर्णिमेनिमित्त फूलबाजारात डच गुलाब, लिली, गुलाबगड्डी, मोगरा या फुलांना दोन दिवसांपासून मोठी मागणी होती. त्यामुळे या फुलांचे भाव तेजीत राहिले; तसेच पावसानेही विश्रांती घेतल्याने बाजारात आवक होत असलेल्या फुलांचा दर्जाही चांगला आहे. गुलछडीचे भाव प्रतिकिलो १२० ते १६० रुपयांपर्यंत गेले. झेंडूला ३० ते ६०, मोगरा २५० ते ४००, डच गुलाब (२० नग) ६० ते १०० रुपये भाव मिळाला.डाळिंब महागलेफळबाजारात आवक कमी झाल्याने डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली, तर कलिंगड, खरबूज व पपईच्या भावात २ ते ५ रुपये भाववाढ झाली आहे. रविवारी डाळिंबाला प्रतिकिलोस १० ते ८० रुपये भाव मिळाला. आवक ६० ते ७० टन एवढी झाली. कलिंगड व खरबुजाची विक्री प्रतिकिलो अनुक्रमे ५ ते १२ आणि १० ते ३० रुपयाने झाली. पावसाने दडी मारल्याने फळांची मागणी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.पालेभाज्यांची आवक मागील काही दिवसांपासून रोडावली आहे. रविवारी कोथिंबिरीची ८५ हजार जुडी, तर मेथीची सुमारे २० हजार जुडी आवक झाली. कोथिंबिरीला शेकडा जुडीमागे १२०० ते २ हजार, तर मेथीला ८०० ते १२०० रुपये भाव मिळाला. शेपू १००० ते १२००, कांदापात ८०० ते १२०० मुळे १५०० ते २०००, चुका ८०० ते १००० रुपयांपर्यंत विक्री झाली.
टोमॅटो, शेवगा, ढोबळी मिरचीची भाववाढ
By admin | Published: July 10, 2017 1:46 AM