राजरत्न सिरसाट/अकोला: गतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूर डाळीचे उत्पादन सरासरी ३५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे या डाळीचे भाव गगनाला भिडले असून, घाऊक बाजारात ८,५00 रुपये क्विंटलच्यावर, तर किरकोळ बाजारात शंभर रुपये प्रतिकिलोच्या जवळपास दर आहेत. या दरवाढीचा ताण यावर्षी सामान्यांच्या खिशावर पडला आहे. भारतात तूर या कडधान्याचे सर्वाधिक लागवड क्षेत्र महाराष्ट्रात आहे. गतवर्षी ९३.२0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला विलंब झाल्याने, तुरीचे लागवडक्षेत्र घटले असून, ८३.२४ लाख हेक्टरपर्यंत ते खाली आले. तूर पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. यावर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते, पण यामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. महाराष्ट्रात १0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होते. २0१३-१४ मध्ये हेक्टरी ८ क्विंटल ८१ किलो डाळीचे उत्पादन झाले; तथापि यावर्षी या उत्पादनात घसरण झाली असून, हेक्टरी केवळ ७00 किलो, म्हणजे सात क्विंटल उत्पादन झाले आहे. अपेक्षित हेक्टरी उत्पादन ११ क्विंटलच्या वर हवे होते, पण गतवर्षी ऐन फुलोरा, शेंगा येण्याच्या अवस्थेत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका या पिकाला बसला. परिणामी या डाळीचे किरकोळ बाजारातील दर शंभर रुपये क्विंटलपर्यंंत पोहोचले. या दरवाढीचा नागरिकांच्या खिशावर ताण पडला आहे. *तुरीचे क्षेत्र दोन दशकांत स्थिर गेल्या दोन दशकांत भारतातील तुरीचे उत्पादन २.७४ ते ३ लाख टन आहे. भारतीय कृषी संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी तुरीचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते; तथापि पाऊस विलंबाने सुरू झाल्याने यावर्षी उत्पादन घटले आहे.
तूर डाळीचे भाव भिडले गगनाला!
By admin | Published: April 03, 2015 2:24 AM