नवी मुंबई : तेलगू असलो तरी मला मराठीचा नितांत आदर आहे. महाराष्ट्राचा राज्यपाल होण्याचे भाग्य लाभले याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. ‘महाराष्ट्र तेलगू समाज मंच’ या संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य साधण्याच्या हेतूने ‘तेलगू आई, मराठी मावशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल बोलत होते. देशात निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित येणे गरजेचे आहे. समाज आणि देशाचा विकास साधण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज आहे, असे मत राज्यपाल राव यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या होत्या. जन्मभूमी कोणतीही असली तरी कर्मभूमी महत्त्वाची असते. त्यामुळे कर्मभूमीचा नेहमीच आदर राखला पाहिजे, असे मत आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी दोन्ही प्रांतांतील संस्कृतीला उजाळा देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर सागर नाईक यांचेही भाषण झाले. संस्थेचे अध्यक्ष जगनभाई गंजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)
‘महाराष्ट्राचा राज्यपाल असल्याचा अभिमान’
By admin | Published: January 12, 2015 3:25 AM