नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच, अर्थसंकल्पामधून चार जातींच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे अर्थमंत्री वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास, असा हा अंतरीम अर्थसंकल्प आहे, 'जय अनुसंधान' हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास देणारा आहे, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
सोशल मीडिया ‘एक्स’वर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आजवर या देशाने 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान...' हा नारा प्रबळ केला; मोदी सरकारचा यापुढचा नारा आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा,आकांक्षा आणि कल्याण हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आणि तोच आजच्या अर्थसंकल्पाचा गाभा आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी म्हटल्याप्रमाणे, मोदी सरकारचा जुलै महिन्यातील अर्थसंकल्प विकसित भारताचा नवा रोडमॅप घेऊन येईल.
सहाव्यांदा बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री मा निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करताना श्री बावनकुळे यांनी बजेटमधील काही गोष्टी ठळकपणे गणल्या. नारीशक्ती, अन्नदाता शेतकरी, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वांगीण विकास साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प तसेच महिला सक्षमीकरण, महिलांना आर्थिक पाठबळ देणारा पायाभूत सुविधा मजबूत करणारा व युवकांना उद्यमशीलतेला - स्टार्टअप इनोवेशनला बळ देणारा 'रोजगारदाता' अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.