ऑनलाइन लोकमत/जयंत धुळत
अलिबाग, दि. 25 - बैठकीमधील मौखिक निरुपणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाज परिवर्तनाच्या विचार प्रक्रियेची भारत सरकारने दखल घेतली याचा आनंद आहे. पुरस्कारामुळे नवा उत्साह प्राप्त होऊन हूरुप वाढून आपण करीत असलेले कार्य अधिक गतिमान होते, अशी प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर ज्येष्ठ निरुपणकार डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बैठकीच्या माध्यमातून मानवाच्या मनात सद्दविचारांची पेरणी करुन त्यांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करीत असतानाच, पर्यावरण आणि स्वच्छ भारत अभियानाचा विचार मानवी मनामनात रुजवण्यात बैठकीचे महत्व अनन्य साधारण आहे. पुरस्कारामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला आहे. चांगल्या विचारांच्या कामासोबत सारेच असतात, त्यातूनच सर्वांचे सहकार्य मिळते. याचीच ही अनुभूती असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले.