आनंदऋषीजींनी काही सुभाषितवजा काव्यरचना केली होती.अधर्म अश्रद्धा,धर्म श्रद्धा आहे.असत्य अधर्मसत्य श्रद्धा आहे...ही त्यापैकीच एक.अधर्म ही अंधश्रद्धाच आहे आणि धर्मावर विश्वास ही खरी श्रद्धा आहे. खोटेपणा हा अधर्म असून सत्य हीच खरी श्रद्धा आहे, असा अर्थ या रचनेत सामावला आहे.आनंदऋषीजींचे विचार अत्यंत जीवनवादी आहेत. देह नश्वर असतो, पण गुण शाश्वत असतात. गुणांनी सालंकृत होऊन जो संसार करतो, त्याला उत्तम प्रतिचा आनंद सदा सर्वकाळ प्राप्त होतो, हे त्यांचे विचारधन आहे. नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील शिराळ-चिचोंडी हे त्यांचे जन्मगाव. श्री देवीचंदजी गुगळे व श्रीमती हुलासाबाई हे त्यांचे जन्मदाते. नेमिचंद्र हे त्यांचे मूळ नाव. त्यांना एक भाऊ व एक बहीण.नेमीचंद्र यांची बुद्धी लहान वयातच प्रगल्भ बनत चालली होती. त्यांचे सवंगडी खेळण्यात मग्न असत तेव्हा ते भजन-कीर्तनात लीन होत. लहानपणापासूनच त्यांची प्रवृत्ती आध्यात्मिक होती. आजीवन ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून जैन धर्माची उपासना करण्याचा निर्णय त्यांनी आईला सांगितला होता.रत्नऋषी महाराज चिचोंडीला आले त्या वेळी नेमिचंद्र्रने त्यांच्याकडून सामायिक प्रतिक्रमणाचा विधी शिकून घेतला. जवळ जवळ दीड-दोन तास मांडी घालून दररोज हे सूत्र कंठस्थ करावयाचे असते. जैन धर्माचा सर्वांगीण अभ्यास त्यांनी त्या काळात केला. पाली व अर्धमागधी भाषेबरोबरच संस्कृत भाषेचे अध्ययन केले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी मिरी येथे जैन धर्माची दीक्षा रत्नऋषींकडून घेतली. आनंदऋषी हे नवे नामाभिधान त्यांना लाभले. केवळ दोन महिन्यांच्या अवधीत संस्कृतमधील शब्द रूपावली, धातू, रूपावली, समासचक्र आणि रघुवंशाच्या दोन सर्गाचे अध्ययन त्यांनी करून दाखविले. आनंदऋषीजी यांना अध्यापन करण्यासाठी बनारसहून व्यंकटेशशास्त्रींना पाचारण करण्यात आले. त्यांनी लघुकौमुदी व किराताजुर्नीयच्या दुसऱ्या सर्गाचे अध्यापन केले. त्यानंतर काशीहून आणखी एक विद्वानाला बोलावले गेले. जे विद्वान आनंदऋषींना प्रदीर्घ काल शिकविण्यासाठी यायचे, ते सर्व काही महिन्यांतच परतायचे. कारण आनंदऋषीजी ४-६ दिवसांतच ज्ञान ग्रहण करीत असत.आनंदऋषींना शिकवण्यासाठी संस्कृतमधील प्रकांड पंडित पाहिजे, अशी जाहिरात त्या काळी वर्तमानपत्रात दिली गेली होती. वाराणसी विद्यापीठातील पंडित श्री. राजधारी त्रिपाठी यांची निवड त्यासाठी आलेल्या अर्जांतून केली गेली.आनंदऋषीजींना मराठी अतिशय चांगल्या प्रकारे अवगत होती. मराठीतून ते खेडोपाडी व्याख्याने देत. त्यांनी विचार केला की, जैन धर्माची शिकवण आता हिंदी किंवा अर्धमागधीतून नाही, तर मराठी भाषेतून महाराष्ट्राच्या लोकांना दिली गेली पाहिजे. अनेक ग्रंथ त्यांनी अनुवादित केले. हिंदी भाषेतून अनेक ग्रंथ लिहिले. तिलोकऋषीजी, रत्नऋषीजींचे जीवन चरित्र, ऋषी संप्रदायाचा इतिहास, अध्यात्म दशहरा, समाजस्थिती दिग्दर्शन, सम्राट चंद्रगुप्त, चित्रालंकार काव्य-एक विवेचन, ही त्यांनी लिहिलेली काही हिंदी पुस्तके.जैन समाजाला ज्ञानाचा मार्ग खुला करण्यासाठी अनेक संस्थांची निर्मिती त्यांनी केली. पाथर्डीत त्यांनी रत्न जैन पुस्तकालयाची स्थापना केली. नागपूर येथे जैन धर्म प्रचारक संस्था उघडली. श्री. तिलोक जैन विद्यालय व अमोल जैन सिद्धांत शाळेची स्थापनाही केली. पाथर्डीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अखिल भारतीय जैन धार्मिक परीक्षा बोर्ड स्थापन केले. संबंध भारतात आजही ही संस्था जैन धर्माचे शिक्षण व परीक्षा घेण्याचे काम करते.मुंबईची अमोल जैन पाठशाळा, बोदवड (नासिक)ची रत्नजैन बोर्डिंग, पुण्याची महावीर जैन पाठशाळा, चिचोंडीचे महावीर वाचनालय, राजस्थानमधील स्थानकवासी जैन छात्रालय, श्रीरामपूरची रत्न जैन श्राविका, पंजाबच्या फरीदकोट येथील जैन सिद्धांत शाळा अशा२५ संस्थांना त्यांनी ऊर्जितावस्था दिली.१९९९ विक्रम संवतमध्ये जेव्हा आचार्य देवजी ऋषींचे महानिर्वाण झाले तेव्हा साधूसंघाने आनंदऋषीजी यांना ‘आचार्य’ हे पद देण्याचे ठरविले. २००६ मध्ये राजस्थानातील ब्यावर येथे जैन धर्मातील पाच संप्रदायांचे शिखर संमेलन झाले होते. त्यात त्यांना पुन्हा ‘आचार्य’ पद मिळाले. २००९ मध्ये सादडी येथे झालेल्या साधू संमेलनात ‘आचार्य सम्राट’ म्हणजेच प्रधानाचार्याचे पद मिळाले. जीवनाच्या अखेरपर्यंत ते हे पद भूषवित राहिले.जीवनाचा सुरुवातीचा व शेवटचा कालखंड त्यांनी अहमदनगरला व्यतीत केला. मधल्या ५० वर्षांत भारताची पायी भ्रमंती केली. अनेक शहरांत त्यांनी चातुर्मास केला व लोकांना जैन धर्माचे विश्वव्यापक दर्शन घडविले. हर्षमुनी, प्रेमऋषी, मोतीऋषी, ज्ञानऋषी, कुंदनऋषी, चंद्रऋषी, हिंमतऋषी, रतनमुनी हे त्यांचे प्रमुख शिष्य. आपल्या अमोघ वाणीने व प्रभावी व्यक्तिमत्त्वाने त्यांनी जैन व जैनेतर लोकांवर अमीट प्रभाव टाकला. त्यांचे जीवन आधुनिक संतांच्या शृंखलेत अग्रक्रमाने तळपत राहिले.- प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर(लेखक अहमदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
मानवतेचे पुजारी; राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 3:44 AM