मुंबई : एका हॉटेल मालकाला जागा विकण्यासाठी धमकाविणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीचा खास हस्तक युसूफ सुलेमान कादरी उर्फ युसूफ बचकाना विरोधात गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने शनिवारी विशेष मोक्का न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.नागपाडा-आग्रीपाडा जंक्शनवर असलेल्या सुपारीवाला चाळीमध्ये एका हॉटेल मालकाच्या नावावर ८ हजार ३०० चौरस फुटाचा भूखंड आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला तो विकसित करायचा होता. त्यासाठी तो जागा मालकाला त्याने अनेक आमिषे दाखविली होती. मात्र, तो ऐकत नसल्याने अखेर या हॉटेल व्यावसायिकाने म्हैसूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पुजारीचा हस्तक युसूफ बचकाना याची भेट घेऊन, या हॉटेल व्यावसायिकाला धमकावण्यासाठी सुपारी दिली होती. त्यानंतर त्याच्या टोळीतील तारिक सिद्धिकी आणि अब्दुल्ला अहमद उर्फ बाबा यांनी या हॉटेल व्यावसायिकाला फोन करून २० कोटी रुपये किमतीचे हॉटेल ४ कोटी रुपयांना विकण्यासाठी धमकावले होते. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने एप्रिल महिन्यात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने सिद्धिकी आणि अब्दुल्ला यांच्या पाठोपाठ युसूफ बचकाना याला म्हैसूर कारागृहातून अटक केली होती.
पुजारीचा हस्तक बचकाना विरोधात आरोपपत्र दाखल
By admin | Published: December 13, 2015 1:47 AM