- रजनीकांत कदमकुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या ५७व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीची सुरुवात ६ नोव्हेंबर रोजी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या बिकट वाट वहिवाट या नाटकाने होत असून, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नाट्य मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला असल्याने सिंधुदुर्गातील नाट्य चळवळ अधिकच जोमाने वाढते आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्यावतीने महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे आयोजन दरवर्षी संपूर्ण राज्यभरात केले जाते. यंदा या स्पर्धेचे ५७ वे वर्ष असून या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रत्येक विभागात प्रारंभ होणार असून रत्नागिरी केंद्रावरील या प्राथमिक फेरीची सुरुवात ६ नोव्हेंबरपासून रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे. या केंद्रावर ही स्पर्धा २३ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, या कालावधीत १९ नाटकांचे नाट्याविष्कार यावेळी सादर होणार आहेत.देशाला कोकणाने नेहमीच सर्वच ललित कला क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कलाकार दिले आहेत. नाट्यक्षेत्रात ही कोकण नेहमीच अग्रेसर राहीले आहे. या कोकणामध्ये मोठ्या संख्येने हौशी नाट्ये मंडळे असून या मंडळांच्यां वतीने दरवर्षी विविध विषयावरती नाटके बसविण्यात येतात. त्यामुळे या नाट्य क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या हौशी नाट्यमंडळे व कलाकारांना आपली कला सादर करता यावी हा उद्देश ठेवत शासनाच्यावतीने या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. हौशी नाट्य मंडळांनाही या स्पर्धेमुळे चांगले व्यासपीठ मिळाले आहे. कला क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख ही दशावतार या नाट्यकलेने केली जात आहे. या जिल्ह्यात नाट्य चळवळ ही फार पूर्वीपासून सुरू असून ती आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.यंदा ही स्पर्धा ६ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, पहिले नाटक कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे, बिकट वाट वहिवाट (दिग्दर्शन अमित देसाई) हे नाटक सादर होणार आहे तर दि.७ नोव्हेंबर रोजी कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे, मागच्या बेंचवरची मुलगी (दिग्द.रघुनाथ कदम), दि. ८ नोव्हें. रोजी श्रीरंग, रत्नागिरीचे, वरचा मजला रिकामा (दिग्द.भाग्येश खरे), दि. ९ नोव्हें. रोजी केळकर महाविद्यालय, देवगडचे, ब्रेकिंग न्यूज (दिग्द. अभिषेक कोयंडे), दि. १० रोजी श्री देवी जुगाई कलामंच, कोसुंब संगमेश्वरचे, मन कोवळे उन्हाचे (दिग्द. सुनील जाधव), दि.११ रोजी संकल्प कलामंचचे, मी इतिहास गाडला नाही (दिग्द.चंद्रकांत कांबळे), दि. १३ रोजी खल्वायन रत्नागिरीचे, कॉफी (दिग्द. प्रणव यादव), दि. १४ रोजी साईकला कला क्रीडा मंच, सिंधुदुर्गचे, अशुध्द बीजापोटी (दिग्द. केदार देसाई), दि. १५ रोजी सहयोग, रत्नागिरीचे अतर्क्य, दि. १६ रोजी ओम साई मंडळ मिरजोळे, रत्नागिरीचे, ती रात्र (दिग्द. शेखर जोशी), दि. १७ रोजी नेहरूबुवा कलादर्शन नाट्यमंडळ पालीचे, कुणी तरी आहे तिथं (दिग्द. अमोल रेडीज), दि. १८ रोजी संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच देवरूखचे, ती रात्र (दिग्द. संजय सावंत), दि. २० रोजी कलावलय वेंगुर्लाचे, निखारे (दिग्द. संजय पुनाळेकर) ही नाटके दररोज सायंकांळी ७ वाजता सुरू होणार आहेत.तर दि. २१ नोव्हें. रोजी सकाळी ११.३० वा. रत्नसिंधु, सामाजिक व शैक्षणिक विकाससेवा संस्था हातखंबाचे, येस माय डियर (दिग्द. पुजा जोशी) व सायंकांळी ७ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान चिपळूणचे, कोर्ट मार्शल (दिग्द.अभिजित काटदरे), दि. २२ नोव्हें. रोजी स. ११.३० वा. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाचे, कॅप्टन.... कॅप्टन (दिग्द.मनोहर सुर्वे), सायं. ७ वा. बाबा वर्दम थिएटर्स कुडाळचे, एकदा पहावं न करून ( दिग्द. वर्षा वैद्य), दि. २३ नोव्हें. रोजी स. ११.३० वा. आभार सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ रत्नागिरीचे, अल्बम (दिग्द.चंद्रशेखर मुळ्ये) व सायं. ७ वा. अक्षरसिंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्गचे, भावीण (दिग्द. सुहास वरूणकर) ही नाटके सादर होणार आहे.तीन ते चार महीने चालते तालिमया स्पर्धेच्या अगोदरच तीन ते चार महिने नाट्य मंडळे नाटकाच्या तालीमी घेतात. जसजसे स्पर्धेचे दिवस जवळ येतात तसतशी या नाट्यकलाकारांचा उत्साह जोमाने वाढत असतो.सिंधुदुर्गातील सात संघ सहभागी.या नाट्य स्पर्धेत १९ संघ सहभागी झाले असून यामध्ये सिंधुदुर्गातील ७ संघानी सहभाग घेतला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील १२ संघ स्पर्धेत आहेत. यंदा या स्पर्धेत सिंधुदुर्गातील संघाचा सहभाग वाढला आहे.
रत्नागिरीत ६ तारखेपासून ५७व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील १९ संघ सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 8:13 PM