बारामती : तालुक्यातील जैनकवाडी येथील शेतकऱ्याचे कांदा उत्पादनातून नुकसान झाले. शेतकºयाचा खर्च ४५ हजार झाला. उत्पन्न मात्र ८ हजार ५०० रुपये मिळाले. त्यातून उद्विग्न झालेल्या शेतकºयाने बारामती येथे चक्क दोन टन कांदा नागरिकांना फुकट वाटला. या वेळी ठेवण्यात आलेल्या दानपेटीत जमा झालेली १ हजार ४१९ रुपये एवढी रक्कम या शेतकºयाने पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना सोमवारी पोस्टाने ‘मनीआॅर्डर’द्वारे पाठवली आहे.जैनकवाडी येथील तरुण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने ५ डिसेंबर रोजी नागरिकांना फुकट कांदा वाटला. ‘कांदा नेणाºयांनी स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठविण्यात येणार आहेत,’ असा फलक या ठिकाणी लावला होता. या वेळी कांदा मोफत नेणाºया नागरिकांनी दानपेटीत २ हजार ८३८ रुपये जमा केले होते. काळे यांनी ही रक्कम समान विभागून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरने पाठविली आहे.काळे यांचे जैनकवाडी परिसरात दीड एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली. त्यासाठी त्यांना ४५ हजार रुपये खर्च आला. दीड एकरात १५० पिशव्या कांदा उत्पादन झाले. त्यांपैकी १२० बॅग कांदा कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला. या कांद्याला त्यांना प्रतिकिलो अवघा ४ रुपये भाव मिळाला. कांदाविक्रीतून वाहतूक खर्च वगळता १२ हजार ४८८ रुपये त्यांच्या हाती आले. त्यांपैकी बारदान्याचा ३,५०० रुपये खर्च वजा जाता ८ हजार ९८८ रुपये उरले. त्यामुळे खर्च ४५ हजार झाला; उत्पन्न मात्र ८ हजार ५०० रुपये मिळाले. त्यामुळे काळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. दिनेश काळे यांनी शेती विकसित करण्यासाठी कॅ नरा बँकेकडून चार वर्षांपूर्वी ७ लाख रुपये कर्ज घेतले होते. आता व्याजासह ही रक्कम ११ लाखांवर पोहोचली आहे. हे कर्ज भरण्यासाठी आता बँकेकडून तगादा चालू झाला आहे. त्यामुळे कष्ट करूनदेखील उपयोग होत नाही. कष्ट करून पिकविलेला कांदा फुकट वाटताना माझ्या मनाला बरे वाटले असेल का? पण कांदा वाटून मनापासूनचा उद्रेक व्यक्त केल्याचे दिनेश काळे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. ४ रुपये दराने विकलेल्या कांद्याचा बाजारातील दर १५ रुपये शेतकरी त्याने घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाची किंमत ठरवू शकत नाही, ही शोकांतिका आहे. उलट ४ रुपये दराने विक्री केलेला कांदा मात्र बाजारात १२ ते १५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागत आहे. शेती करताना आमच्या वाट्याला आलेली उपेक्षा मुलांना सहन करावी लागू नये म्हणून त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्हा दोघा नवरा-बायकोचा आहे. पण, मुलांनी शाळेत जाताना ५० रुपये मागितले तरी अनेक वेळा काळजावर दगड ठेवून ‘नाहीत’ असे म्हणावे लागते, अशी व्यथा शेतकरी दिनेश काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कांदा उत्पादकाची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना ‘मनीऑर्डर’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:55 AM