नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेल्या लंडन येथील वास्तूचे लोकार्पण १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या इंग्लंड दौऱ्यातच हा कार्यक्रम होणार असल्याने त्याला जागतिक प्रसिद्धी मिळणे अपेक्षित आहे. या वास्तूचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्र सरकारने विनंती केली आहे. इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या पाठोपाठ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दीक्षाभूमी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, बाबासाहेबांचे आर्थिक विषयावरील विचार आजच्या परिस्थितीत अतिशय सुसंगत आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक विचारांवर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये आंबेडकर अध्यासन सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. इंदू मिल येथील डॉ. आंबेडकरांचे स्मारक अत्यंत सुंदर व आकर्षक तयार करण्यात येणार असून, या माध्यमातून या महामानवाचे विचार जगासमोर मांडण्याचा व समतेचे राज्य निर्माण करण्याचा निश्चय आहे. लंडनमध्येसुद्धा बाबासाहेबांचे स्मारक अतिशय चांगले व प्रेरणादायी ठरावे, अशी अपेक्षा आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
लंडनमधील ‘त्या’ वास्तूचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते
By admin | Published: October 18, 2015 3:11 AM