ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - चैत्रमहिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासूनच नववर्षाची सुरु वात होते. गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाडव्याच्या निमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
सिद्धीविनायकाच्या काकड आरतीला हजेरी लावत भाविकांनी मराठी नववर्षाचं स्वागत केले. मराठमोळ्या नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाऊंटवरून महाराष्ट्रातील जनतेला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या या खास मुहूर्ताच्या शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आनंदी, निरोगी आणि भरभराटीचे जावो', असे ट्विट नरेंद्र मोदी केले आहे.
Wishing the people of Maharashtra on the special occasion of Gudi Padwa. May the coming year bring happiness, good health & prosperity.— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2017
दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे आणि डोंबिवली परिसरातील शोभायात्रा गुढीपाडव्याचे आकर्षण ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठेतही गेल्या काही दिवसांपासून लगबग पाहायला मिळत आहे. शहरातील दुकाने साखर गाठींनी सजली आहेत.