कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा : भाजपची जय्यत तयारीनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ आॅगस्ट रोजी विदर्भात दाखल होत आहेत. विविध विकास कामांचे भूमिपूजन करून मोदी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उपराजधानीत फोडणार आहेत. कस्तूरचंद पार्कवर हा सर्व कार्यक्रम शासकीय पातळीवर होणार असला तरी हजारो भाजप कार्यकर्ते जमणार असल्यामुळे या कार्यक्रमाला जाहीर सभेचे रूप येणार आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी यांचे नागपुरात विमानतळावर आगमन होईल. हेलिकॉप्टरने मौदा येथील कार्यक्रमासाठी जातील. तेथून वर्धा येथे जातील. तेथील कार्यक्रम आटोपून नागपुरात येतील. सायंकाळी ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पास पारडी उड्डाण पूल, बुटीबोरी- तुळजापूर महामार्ग चौपदरीकरणाचे भूमिपूजन होईल. राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पंतप्रधान मोदी नागपुरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी जय्यत तयारी चालविली आहे.नागपूर व परिसरातून सुमारे एक लाख लोक मोदींच्या सभेसाठी येतील, असे नियोजन आखण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन प्रस्तावित असलेल्या बहुतांश प्रकल्पात राज्य सरकारचाही वाटा आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील रीतसर निमंत्रण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री चव्हाण या कार्यक्रमांना उपस्थित राहिले तर मात्र कार्यक्रमाला राजकीय रंग देण्यावर मर्यादा येतील. असे असले तरी उपस्थित जनसमुदायात बहुसंख्य भाजप कार्यकर्ते राहणार असल्यामुळे या सभेतही ‘हर हर मोदी’चा नारा गुंजण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ आॅगस्ट रोजी सियाचीनचा दौरा करतील, असा कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयाने आखला होता. त्यामुळे नागपुरातील दौरा रद्द होण्याची शक्यता होती. मात्र, सियाचिन दौरा यापूर्वीच होत असल्यामुळे आता मोदींचा विदर्भ दौरा निश्चित मानला जात आहे. (प्रतिनिधी)गडकरींनी घेतली बैठक पंतप्रधान मोदी यांच्या प्रस्तावित विदर्भ दौऱ्याच्या तयारीसाठी रविवारी केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी नागपूर शहर, ग्रामीण व वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मोदींच्या या दौऱ्याची जय्यत तयारी करण्याच्या सूचना या वेळी गडकरी यांनी दिल्या.
पंतप्रधान मोदी फोडणार प्रचाराचा नारळ
By admin | Published: August 11, 2014 12:58 AM