लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: २४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधाननरेंद्र मोदी देखील उतरणार आहेत. भाजपसह महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात दहा प्रचारसभा व्हाव्या, यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रयत्नशील आहे. राज्याच्या प्रत्येक विभागात दोन अशा एकूण दहा प्रचारसभा पंतप्रधान मोदी घेतील. लवकरच त्यांच्या दौऱ्याला अंतिम स्वरूप मिळेल, अशी माहिती भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारातसाठी देखील पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. मुंबईत त्यांचा मोठा रोड शो झाला होता. आता विधानसभेच्या प्रचारात देखील मोदींनी सभांचा धडाका लावावा, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. राज्यात त्यांच्या किमान दहा सभांचे प्रदेश भाजपाचे नियोजन आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
या काळात सभा
७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या काळात पंतप्रधानांच्या महाराष्ट्रातील सभा आयोजित होतील. १४ नोव्हेंबरनंतर पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्रात १८ नोव्हेंबर रोजी प्रचार संपेल. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान प्रचारात नसतील.
घटक पक्षांचीही मागणी
पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदेसेना आणि अजित पवार गट या अन्य दोन घटक पक्षांनीही केली आहे.
केजरीवालही येणार
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकांत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचा प्रचार करणार आहेत. ही माहिती आप पक्षाच्या सूत्रांनी गुरुवारी दिली. महाराष्ट्र विकास आघाडीतील उद्धव ठाकरे सेना, शरद पवार गट यांच्यासाठी केजरीवाल प्रचार करतील, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकांपूर्वी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीचा आप हा घटक पक्ष आहे.