पुणे : काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेली पुणेरी पगडी मंगळवारी पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी शरद पवार नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पगडीची हवा झाल्याचे दिसून आले आहे.आज पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांना देण्यात आलेली पगडी त्यांना फक्त आवडलीच नाही तर ती दिल्लीलाही नेण्यात आली.
आज पुण्यात शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी मोदी यांचे पुणेरी पगडी आणि उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी ही आगळीवेगळी पगडी बघून त्यांना आनंद तर झालाच पण त्यांच्या टीमने ही पगडी दिल्लीलाही नेली.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी घालावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पुणेरी विरुद्ध फुले पगडी असा वाद सुरू झाला होता.त्यात पुणेकरांचा अपमान झाल्याचेही म्हटले गेले.अखेर पवार यांनीचं या वादावर पडदा टाकला. मात्र तेव्हापासून भाजपच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी देऊनच सन्मान करण्याची प्रथा सुरू झाली. मोदी यांचेही स्वागत त्याचं प्रथेप्रमाणे करण्यात आले.
दरम्यान मोदी यांच्यासाठी मुरुडकर झेंडेवाले यांनी खास पगडी बनवली असून त्यात मोती आणि खड्यांनी कलाकुसर करण्यात आली आहे.ही कलाकुसर करताना खडे मेट्रोच्या आकाराप्रमाणे दिसतील असाही प्रयत्न यावेळी करण्यात आला.मोदी यांच्यासह रतन टाटा यांच्यासाठीही पगडी बनवण्यात आली.